श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीचा उपक्रम
सप्ताहाच्या किर्तन-प्रवचनातून समाजाला दिशा मिळत आहे -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त उत्सव समितीच्या वतीने शहरातील माळीवाडा वेस येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे सोमवारी (दि.10 जुलै) शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, नगरसेविका मंगलताई लोखंडे, ह.भ.प. प्रभाताई भोंग, उत्सव समितीचे अध्यक्ष छबुराव (नाना) जाधव, माजी नगरसेवक सुरेश आंबेकर, समता परिषदेचे महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, संभाजीराव मिस्कीन, चंद्रकांत फुलारी, बाळासाहेब विधाते, कन्हैया बालानी, किरण बोरुडे, अवधुत पुंड, ह.भ.प. बाळकृष्ण महाराज खेसे, जालिंदर महाराज निकम आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात उत्सव समितीचे अध्यक्ष छबुराव (नाना) जाधव म्हणाले की, अध्यात्म, धार्मिक विचाराला चालना देऊन भावीपिढी पर्यंत सप्ताहाच्या माध्यमातून संस्कार घेऊन जाण्याचे कार्य श्री संत शिरोमणी सावता महाराज उत्सव समिती सप्ताहाच्या माध्यमातून करत आहे. मागील सतरा वर्षापासून अविरतपणे या सप्ताहाचे आयोजन केले जात असून, मोठ्या संख्येने भाविक याचा लाभ घेत आहे. तर धार्मिक सोहळ्याबरोबर सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, यावर्षी आरोग्य शिबिर घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, सप्ताहाच्या किर्तन-प्रवचनातून समाजाला दिशा मिळत आहे. ग्रामीण भागात सप्ताहाची चळवळ सुरू असून, शहरातही त्याचे आयोजन केले जात आहे. नव्या पिढीचे प्रबोधन करुन त्यांच्यात संस्कार व अध्यात्मिक विचार रुजविण्याचे कार्य हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून होत आहे. शहराची जडणघडण होत असताना, अध्यात्मिक वारसा व विचार देखील या उपक्रमाद्वारे चालविले जात आहे. तर गरजू भाविकांना आरोग्य शिबिराची जोड देऊन आरोग्य जपण्याचे कौतुकास्पद उपक्रम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
अभय आगरकर म्हणाले की, शहरात या सप्ताहाद्वारे धार्मिक विचार, संस्कृती व अध्यात्मतेचे महायज्ञ सुरु झाले आहे. समाजाला दिशा देण्यासाठी प्रामाणिकपणे व तळमळीने प्रत्येकाच्या सहयोगातून हे कार्य सुरु असून, इच्छाशक्ती, परिश्रम, पैसा व वेळ देऊन हा सप्ताह होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या सप्ताहानिमित्त सोमवारी दुपारी नागेश्वर भजनी मंडळाचा भजन कार्यक्रम रंगला होता. तर रात्री ह.भ.प. बाळकृष्ण महाराज खेसे यांचे कीर्तन झाले. मंगळवारी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचे कीर्तन होणार आहे. 16 जुलै रोजी सायंकाळी दिंडी सोहळा रंगणार आहे. तर सप्ताहाचा समारोप सोमवारी 17 जुलै रोजी ह.भ.प. विकासानंद महाराज मिसाळ यांच्या काल्याचे किर्तनाने होणार असून, कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहनिमित्त दररोज पहाटे काकडा भजन, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ व रात्री कीर्तन कार्यक्रम रंगत आहे. उत्सव समितीच्या वतीने या धार्मिक सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन शहरातील भाविकांना करण्यात आले आहे.