वाचनालयास पुस्तकांची भेट
समाजकारणाने गावाला दिशा देण्याचे डोंगरे यांचे कार्य -प्रा. रंगनाथ सुंबे
अहमदनगर (प्रतिनिधी)- विविध क्षेत्रात सामाजिक योगदानाबद्दल सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांना भिम पँथरच्या वतीने समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल चास (ता. नगर) येथील श्री नृसिंह विद्यालयात त्यांचा रोप वाटून आगळ्या-वेगळ्या पध्दतीने सन्मान करण्यात आला.
डोंगरे यांचे सामाजिक क्षेत्रासह पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण व संवर्धन मोहिम सुरु आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराचा सत्कार आगळ्या-वेगळ्या पध्दतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत करण्यात आला. तसेच निमगाव वाघा (ता. नगर) येथे असलेल्या धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयासाठी त्यांच्याकडे रंगनाथ सुंबे लिखित व्याकरणामृत पुस्तकांची भेट देण्यात आली. यावेळी नृसिंह विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कमल घोडके, प्रा. रंगनाथ सुंबे, आदम शेख, आशिष आचारी, राजेंद्र राऊत, सुहास नवले, दादाराम हजारे, महेश मुळे, अनिल पंडित, वर्षा पडवळ, कल्पना ठुबे, आशंका मुळे, स्वाती अहिरे, पुष्पवर्षा भिंगारे, भाग्यश्री वेताळ, आशा आरडे, मंजुषा दरेकर आदी उपस्थित होते.
प्रा. रंगनाथ सुंबे म्हणाले की, समाजकारणाने गावाला दिशा देण्याचे कार्य नाना डोंगरे करत आहे. विविध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ते योगदान देत आहे. सामाजिक, साहित्य, क्रीडा व पर्यावरण क्षेत्रातील त्यांचे योगदान दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना पै. नाना डोंगरे म्हणाले की, रोप देऊन केलेला सत्कार मनाला भावला. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज असून, या चळवळीत लोकसहभाग मिळाल्यास बदल घडणार आहे. मिळालेले पुरस्कार व मान-सन्मान आनखी कार्य करण्याची ऊर्जा देत असल्याचे त्यांनी सांगितले.