जीवनधारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल लगड यांचा सामाजिक उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- गुरुपौर्णिमेनिमित्त जीवनधारा प्रतिष्ठानच्या वतीने बोल्हेगाव परिसरातील विधवा महिला व दिव्यांग पालकांच्या मुलांसह आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल लगड यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

काकासाहेब म्हस्के रोड, आंबेडकर चौक येथे मनपा स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, निखील वारे, कामगार नेते बाबासाहेब बारस्कर, राजुशेठ कचरे, रामाशंकर यादव, अतिक शेख, संतोष ताकपेरे, महादेव पवार, कृष्णकांत यादव, अतुल लगड, सिद्दीक शेख, संगम नेहुल, संदेश अरुण आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात अमोल लगड यांनी परिस्थितीची जाणीव ठेवून गरजू घटकातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात टिकण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याची मदत केली जाते. हा उपक्रम सातत्याने सुरु असून, भविष्यात निराधार मुलांचे शैक्षणिक पालकत्व देखील स्वीकारण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कुमारसिंह वाकळे पाटील म्हणाले की, प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून योगदान द्यावे. जीवनधारा प्रतिष्ठान सामाजिक भावनेने देत असलेले योगदान दिशादर्शक आहे. दरवर्षी गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन त्यांना आधार देण्याचे कार्य सुरु आहे. विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्याच्या दृष्टीने व त्यांना प्रवाहात आणण्यासाठी घेतलेला उपक्रम प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
डॉ. सागर बोरुडे म्हणाले की, जीवनधारा प्रतिष्ठान खर्या गरजूपर्यंत मदत घेऊन जात आहे. या उपक्रमातून भावी सक्षम पिढी घडणार आहे. सामाजिक योगदान देत असताना प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध प्रश्न देखील सोडवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. निखिल वारे म्हणाले की, प्रत्येकाने सामाजिक जाणीव ठेवावी. लगड यांनी आपल्या शालेय जीवनातील बिकट परिस्थितीची जाणीव ठेवून जीवनधाराच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना केलेली मदत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.