पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदची घोषणा; हुतात्मा स्मारकात कार्यक्रम
“स्वराज्य म्हणजे लोककल्याण आणि न्याय” जातविहीन, लोकाभिमुख प्रशासनाचा दिला जाणार संदेश
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा खरा इतिहास जनतेपर्यंत पोहोचविणाऱ्या गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाला महाराष्ट्र दिनी, 1 मे रोजी ‘राष्ट्रीय जनलोक क्रांती ग्रंथ’ म्हणून घोषित करण्यात येणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
या घोषणेचा कार्यक्रम शहरातील हुतात्मा स्मारक येथे सकाळी 10:30 वाजता पार पडणार असून, यावेळी या ग्रंथाचे महत्त्व आणि त्यातील विचार जनतेसमोर मांडले जाणार आहेत. संबंधित ग्रंथ हा केवळ ऐतिहासिक माहितीपुरता मर्यादित नसून, तो शासनशास्त्राचा जिवंत दस्तऐवज असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
या ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची मांडणी ‘शून्य-जात मावळा स्वराज्य’ या संकल्पनेतून करण्यात आली आहे. जातविहीन, कार्यक्षम आणि लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श या माध्यमातून अधोरेखित केला आहे. सत्ता नव्हे, तर लोककल्याण आणि न्याय हे केंद्रस्थानी ठेवून उभारलेले स्वराज्य हेच या विचारांचे मूळ असल्याचे सांगण्यात आले.
तसेच, हा ग्रंथ भारतापुरता मर्यादित नसून संपूर्ण मानवजातीसाठी मार्गदर्शक ठरू शकतो, असा दावा करण्यात आला आहे. लोकशाहीतील आंतरिक स्वातंत्र्य आणि गुलामगिरीविरुद्ध बौद्धिक लढा कसा द्यावा, याचे मार्गदर्शन या पुस्तकातून मिळते, असे ॲड. गवळी यांनी नमूद केले.
“शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे केवळ राजकीय नव्हते, तर ते सर्वसामान्यांचे सर्वोच्च राज्य होते,” असे मत त्यांनी व्यक्त केले. सध्याच्या जात, अंधश्रद्धा आणि भीतीवर आधारित व्यवस्थेला उत्तर देण्यासाठी या ग्रंथातील विचार महत्त्वाचे ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या उपक्रमातून इतिहास नव्याने समजून घेण्याची गरज अधोरेखित करण्यात आली असून, “जग बदलायचे असेल तर इतिहास नव्याने समजून घ्यावा लागेल,” असा संदेश संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाला ‘राष्ट्रीय जनलोक क्रांती ग्रंथ’ म्हणून घोषित करण्यासाठी ॲड. गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, शाहीर कान्हु सुंबे, जालिंदर बोरुडे, ॲड. लक्ष्मणराव पोकळे, वीर बहादूर प्रजापती, संतोष खामकर, ओम कदम, पोपट शेळके, धनंजय मडके, कैलास पठारे, ॲड. विद्या शिंदे, राजेंद्र कर्डिले, दिलीप घुले, प्रकाश गोसावी आदी प्रयत्नशील आहेत.
