मयत कर्मचाऱ्यांच्या पत्नी व सेवानिवृत्तांना एसटीचा मोफत पास; संघटनेच्या कार्यकर्त्यांचा संभाजीनगर येथे सन्मान
सेवानिवृत्तांच्या हक्कासाठी संघटना कटिबद्ध -बलभीम कुबडे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सेवानिवृत्त एसटी कर्मचारी संघटना अहिल्यानगर शाखेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने मयत झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पत्नींना व सेवानिवृत्तांना वर्षभरासाठी मोफत एसटीचा पास मिळाला आहे. या उल्लेखनीय कार्याबरोबरच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सक्रियपणे काम करणाऱ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा छत्रपती संभाजीनगर येथे विशेष सन्मान करण्यात आला. अहिल्यानगर शाखेने केलेल्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमात अहिल्यानगर शाखेचे कार्याध्यक्ष अर्जुनराव बकरे, केंद्रीय सदस्य बलभीम कुबडे, जिल्हा सचिव गोरख बेळगे, जिल्हाध्यक्ष गंगाधर कोतकर, खजिनदार विठलराव देवकर, तसेच राजेंद्र माने, अशोक क्षीरसागर, एकनाथ औटी, एस.एस. शेख (सोनई) आदींचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी राज्य सचिव सदानंद विचारे, राज्य कार्याध्यक्ष श्रीराम गालेवाड, राज्य कोषाध्यक्ष गणेश वायफळकर यांच्यासह संभाजीनगर प्रादेशिक विभागाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांचा सत्कार अहिल्यानगर शाखेच्या वतीने करण्यात आला.
कोपरगाव आगारातून सेवानिवृत्त झालेले माजी सहाय्यक वाहतूक निरीक्षक उदय रोकडे यांची सातारा जिल्ह्यातील श्री रामदास स्वामी संस्थान, सज्जन गड येथे गडाचे व्यवस्थापकपदी निवड झाल्यामुळे त्यांचाही सज्जनगड येथे जावून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला राजेंद्र माने, श्री भांड तात्या, सुनिल घालमे, काशिनाथ लाखे, बाळासाहेब गलांडे, बाळासाहेब काळे, एकनाथ औटी, लाखे, कुबडे, कोतकर, देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
बलभीम कुबडे म्हणाले की, सेवानिवृत्त कर्मचारी हे आपल्या कार्यकाळात आयुष्यभर शासन व जनतेसाठी समर्पित राहतात. मात्र निवृत्तीनंतर त्यांच्या हक्काच्या सुविधा व सवलती मिळवून देण्यासाठी संघटनेला सातत्याने संघर्ष करावा लागतो. अहिल्यानगर शाखेच्या पुढाकारामुळे मयत कर्मचाऱ्यांच्या पत्नींना वर्षभर मोफत पास मिळणे ही अतिशय दिलासादायक बाब आहे. संघटनेचे अर्जुनराव बकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य सुरु आहे. ही केवळ एक सुरुवात असून, भविष्यात आरोग्य सुविधा, पेन्शनमधील अडचणी, प्रवास सवलती, तसेच इतर प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी संघटना प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.