• Fri. Aug 1st, 2025

सामाजिक वनीकरणचे निमगाव वाघा ते कल्याण रस्त्याच्या दुतर्फा झाडांच्या लागवडीस प्रारंभ

ByMirror

Jul 30, 2023

विविध प्रकारच्या 1200 रोपांची केली जाणार लागवड

वृक्षरोपण चळवळ फक्त शासनापुरती मर्यादीत न राहता जबाबदार नागरिकांनी योगदान द्यावे -पै. नाना डोंगरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने निमगाव वाघा ते कल्याण रस्त्याच्या 1200 मीटर अंतरावर रस्ता दुतर्फा 1200 वृक्ष लागवडीच्या कामाचा शुभारंभ वृक्षरोपणाने करण्यात आला. यावेळी उद्योजक अरुण फलके, उपसरपंच अलका गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, वनरक्षक अफसर पठाण, ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड, उद्योजक दिलावर शेख, चाँद शेख, किरण जाधव, प्रमोद जाधव, गणेश येणारे, संतोष रोहोकले, नवनाथ जाधव आदींसह वृक्ष लागवडीचे काम पाहणाऱ्या महिला उपस्थित होत्या.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, पर्यावरणाच्या सुरक्षिततेसाठी वृक्षरोपण काळाची गरज बनली आहे. वृक्षरोपण व संवर्धन ही चळवळ फक्त शासनापुरती मर्यादीत न राहता यामध्ये जबाबदार नागरिकांनी योगदान देण्याची गरज आहे. रस्ता दुतर्फा वृक्षरोपणाने परिसराचे सौंदर्य खुलणार असून, जमिनीची धूप थांबून पर्यावरण संवर्धन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वनरक्षक अफसर पठाण म्हणाले की, जगण्यासाठी ऑक्सिजन आवश्‍यक असून, ऑक्सिजन देणारी देशी झाडे लावण्याची गरज आहे. प्रत्येक गावात वृक्षरोपण व संवर्धन चळवळ बहरल्यास पर्यावरणाचे प्रश्‍न सुटणार आहे. ढासाळलेले निसर्गाचे समतोल वृक्षरोपणाने साधले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


निमगाव वाघा ते कल्याण रोड दुतर्फा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वन क्षेत्रपाल हेमंत उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाराशे रोपांची लागवड करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने करंज, सीताफळ, चिंच, आंबा, आवळा, कांचन, लक्ष्मीतरु अशा विविध प्रजातींची रोपे लागवड करून रस्त्याचे सुशोभीकरण होणार आहे. या वृक्षाच्या संवर्धनासाठी सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून तीन वर्षे देखभाल केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *