राज्यातील युवक-युवती व शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अकोला जिल्ह्याचा आदित्य टोळे याने पटकाविला संविधान चषक
अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनमध्ये राज्यस्तरीय संविधान चषक वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेला राज्यातील युवक-युवती व शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध जिल्ह्यातील स्पर्धक भारतीय संविधान, राज्यघटनेचा सरनामा व लोकशाहीवर मते मांडून आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली.
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय अहमदनगर, बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे व रविदासिया चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करुन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांच्या हस्ते झाले. यावेळी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, बार्टीचे प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, न्यू आर्टस् कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. बाळासाहेब सागडे, राजापूर येथील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष कडलग, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे जिल्हा सचिव संतोष कानडे, रविदासिया चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक संदीप सोनवणे कॉ. बहिरनाथ वाकळे, कवी सुभाष सोनवणे, राहुल पाटोळे, परिक्षक प्रा.डॉ. महेबुब सय्यद, प्रा. डॉ.बापू चंदनशिवे, प्रा. प्राजक्ता ठुबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

राधाकिसन देवढे म्हणाले की, महाराष्ट्रातील युवा वक्त्यांना व्यासपीठ निर्माण करुन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांनी समाजाला नवे विचार व दिशा देण्याची गरज आहे. देशातील युवाशक्तीने सामर्थ्यवान भारत घडणार असल्याचे सांगून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सुरु असलेल्या समता पर्वाची माहिती दिली. दुर्लक्षीत घटकांना विकास व शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली.
संजय खामकर म्हणाले की, महामानवाची जयंती विचाराने साजरी व्हावी, या उद्देशाने या वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महापुरुषांचे विचार व योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहचणार आहे. प्रत्येक स्पर्धेत जय पराजय होत असतो, परंतु तुमचे विचार व कार्य स्पर्धेतून प्रकट होत असतात. महापुरुषांच्या विचारातून देशाला दिशा देण्याचे काम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रमुख वक्त्यांनी या स्पर्धेचे कौतुक करुन स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. उपस्थित परिक्षकांनी वक्तृत्व स्पर्धेतील बारकावे सांगून स्पर्धकांना मार्गदर्शन केले.

मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाल्याने दिवसभर ही वक्तृत्व स्पर्धा रंगली होती. भारतीय संविधानाची मूळ संरचना, भारतीय राज्यघटनेचा सरनामा, संविधानास अभिप्रेत असलेला भारत आणि लोकशाही व संविधान या विषयावर स्पर्धकांनी भाषणं सादर केली. या स्पर्धेत अकोला जिल्ह्यातील आदित्य टोळे याने प्रथम क्रमांक पटकाविला. तर द्वितीय क्रमांक रुपाली माने (पुणे), तृतीय क्रमांक प्रज्वल नरवडे (पुणे) व उत्तेजनार्थ समृध्दी सुर्वे (नगर) ठरले. स्पर्धेतील प्रथम विजेत्यास 3 हजार, द्वितीय विजेत्यास 2 हजार व तृतीय विजेत्यास 1 हजार रुपये रोख, तसेच विजेत्यांसह उत्तेजनार्थला करंडक व प्रमाणपत्र देण्यात आले.

या कार्यक्रमासाठी संदिप सोनवणे, विनोद कांबळे, निलेश आंबेडकर, अमोल डोळस, हरिष शेळके, संदिप डोळस, दिनेश देवरे, संतोष कांबळे, तेजस भगवाणे, दिलीप कांबळे, समतादूत एजाज पिरजादे, सुलतान सय्यद, प्रेरणा विधाते, रवींद्र कटके, वसंत बढे, राजेंद्र धस, चांगदेव देवराय, रामनाथ सोनवणे, सुहास पाखरे आदी उपस्थित होते.