सामाजिक, धार्मिक व पर्यावरण क्षेत्रातील कार्याची दखल
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना सामाजिक, धार्मिक व पर्यावरण क्षेत्रात सुरू असलेल्या निस्वार्थ कार्याबद्दल इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथे मराठी रत्न प्रेरणा पुरस्काराने गौरव करण्यात आला. ए.जे. सोशल वेलफेअर फाऊंडेशनच्या वतीने आयोजित राष्ट्रीय प्रेरणा किरण गौरव सन्मान सोहळ्यात भालसिंग यांना मराठी अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर (स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेतील अभिनेत्री) यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आली.
या सन्मान सोहळ्याप्रसंगी विशेष समाज कल्याण परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर दोलत्तडे, पोलीस मित्र असोसिएशनचे कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्ष स्वाती किल्लेदार, रोहिणीताई पवार, समृध्दी पब्लिकेशनचे संचालक प्रा.डॉ. बी.एन. खरात, आरोग्य विभागाचे स्वरुप काकडे, गणपतराव घोडके, पैगंबर शेख, ए.जे. फाऊंडेशनचे अध्यक्षा डॉ. अबोली जिगजिनी आदी उपस्थित होते.
सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात विजय भालसिंग गेल्या दोन दशकापासून योगदान देत आहे. मूळगाव वाळकी (ता. नगर) येथील असलेले भालसिंग एस. टी. बँकेची नोकरी सांभाळून निस्वार्थपणे कार्यरत असून, कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान व वर्गणी न घेता स्वखर्चातून सामाजिक कार्य करत आहे. वृक्षरोपण व संवर्धनासाठी ते सातत्याने योगदान देत आहेत. उन्हाळ्यात पशू – पक्ष्यांना जगणे सुसहय व्हावे म्हणून पाणवठे तयार करून पाणी उपलब्ध करणे, विविध परिसरात पक्ष्यासाठी झाडांवर धान्य व पाण्याची भांडी बसविणे, सर्वत्र वाढत चाललेल्या सिमेंटच्या जंगलामुळे पशु-पक्ष्यांचे अस्तिव राहण्यासाठी नारळाच्या साली पासून कृत्रिमरीत्या पक्ष्यांसाठी बनवलेले घरटी बसविणे आदी निसर्ग व पर्यावरणपुरक उपक्रम ते सेवाभावाने सातत्याने राबवित आहे. वाळकी पंचक्रोशीतील खराब रस्त्याबाबत सतत पुढाकार व पाठपुरावा करून त्यांनी अनेक खराब रस्त्याच्या मूलभूत प्रश्नासाठी वाचा फोडून ते प्रश्न मार्गी लावले आहेत. या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
भालसिंग यांच्या सामाजिक कार्याबद्दल उपस्थित पाहुण्यांनी कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
