संस्कारक्षम व गुणवत्तापुर्ण शिक्षणाने विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण विकसीत करण्यास सांदिपनी अकॅडमी कटिबध्द -के. बालराजू
विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये पासून ते 2 लाख रुपय पर्यंतची तर 25 टक्के पासून 100 टक्के पर्यंत शिष्यवृत्ती प्रदान
अहमदनगर (प्रतिनिधी)- देशापुढे भ्रष्टाचार व बेरोजगारी हे प्रमुख प्रश्न असून, हे प्रश्न सोडविण्यासाठी शैक्षणिक व्यवस्थेत बदल होण्याची गरज आहे. भावी पिढीला संस्कारक्षम शिक्षण दिल्यास भ्रष्टाचारावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. तर सध्या शिक्षण व्यवस्थेत नोकरीसाठी कामगार घडवले जात आहे. संस्कारक्षम व गुणवत्तापुर्ण शिक्षणाने विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण विकसीत करण्यास सांदिपनी अकॅडमी कटिबध्द आहे. मुलांवर अपेक्षेचे ओझे न लादता, त्यांच्यातील क्षमता पाहून त्यांना भविष्याच्या दृष्टीकोनाने योग्य दिशा देण्याचे कार्य केले जात असल्याचे प्रतिपादन अकॅडमीचे व्यवस्थापकीय संचालक के. बालराजू यांनी केले.
सांदिपनी अकॅडमीच्या वतीने जेईई, नीट तसेच इतर स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा व प्रल्हाद गुरुकुलचे उद्घाटन पार पडले. यावेळी मार्गदर्शन करताना के. बालराजू बोलत होते. माऊली संकुल सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा. सुनिल पंडित, अकॅडमीचे व्यवस्थापकीय संचालक के. बालराजू, अकॅडमीचे नानासाहेब बारहाते, अमित पुरोहित, मनिष कुमार, राहुल गुजराल आदींसह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना के. बालराजू म्हणाले की, शहरात 2015 पासून जेईई, नीट तसेच इतर स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना घडविण्याकरिता सांदिपनी अकॅडमीची मुहुर्तमेढ रोवण्यात आली. याचा भारभर विस्तार करण्यासाठी प्रल्हाद गुरुकुलची या वर्षी पायाभरणी करण्यात आली आहे. मोठ्या शहरात न जाता अहमदनगर शहरातच गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य सांदिपनी अकॅडमी करत आहे. देशाच्या गुणवत्ता यादीत जेईई, नीट सारख्या परीक्षेत पहिल्या शंभर मध्ये अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी येण्याचा मान पटकावला असल्याचे त्यांनी सांगितले.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नृत्य झंकारच्या विद्यार्थिनींनी गणेश वंदना सादर केली. चित्रफीतद्वारे शहरात सन 2015 साली सुरु झालेल्या सांदिपनी अकॅडमीचा आज पर्यंतचा प्रवास उलगडून शैक्षणिक गुणवत्तेचा वाढता आलेख सादर करण्यात आला. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते जेईई, नीट तसेच इतर स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच अकॅडमीतील गुणवंत विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये पासून ते 2 लाख रुपय पर्यंतची तर 25 टक्के पासून 100 टक्के पर्यंत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. तर पीपीएल ही शैक्षणिक स्पर्धेतील विजेता व उपविजेत्या संघास चषक प्रदान करुन बक्षिसे देण्यात आली.
प्रा. सुनील पंडित म्हणाले की, शिक्षणासाठी नावाजलेल्या मोठ्या शहराच्या धर्तीवर अहमदनगर शहरात परिपूर्ण गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्याचे कार्य सांदिपनी अकॅडमी करत आहे. कोरोना काळातही विद्यार्थ्यांना त्यांनी उत्तम पद्धतीने शिक्षण दिले. विद्यार्थ्यांचे वाचन, लिखाण कमी झाल्याने मनन कमी झाले असल्याचे स्पष्ट करुन, त्यांनी वाचन व लिखान करण्याचे आवाहन केले. अमित पुरोहित यांनी प्रत्येक मुलांमध्ये क्षमता असते. ती क्षमता विकसित करण्याचे कार्य अकॅडमीत केले जात आहे. मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांकडून ध्यान धारणा करुन घेतली जात आहे. तर त्यांच्यात संस्कार रुजविण्यासाठी भगवद्गीता, रामायण याचे देखील मार्गदर्शन केले जाते. प्रत्येकाची बौद्धिक क्षमता वेगळी असून, त्या क्षमतेनुसार मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांचे मानसिक मनोधैर्य उंचावून आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षणाचे बाजारीकरण व त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान या विषयावर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी नाटिका सादर करुन पालक व विद्यार्थ्यांना जागृक करण्याचे प्रयत्न केले. सूत्रसंचालन अनिता कुमारी व कोमल सूर्यवंशी यांनी केले. आभार शुभम फुंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अकॅडमीच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतरांनी परिश्रम घेतले.
जागतिक किर्तीचे लेखक ब्रायन ट्रेसी यांची पुढील पुस्तक नोव्हेंबर महिन्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्यासह सहलेखक म्हणून काम करण्याची संधी भारतातील दोन व्यक्तींना मिळाली असून, यामध्ये अकॅडमीचे व्यवस्थापकीय संचालक के. बालराजू यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन यावेळी करण्यात आले.