भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष काते यांचे खासदार विखे यांना निवेदन
कर्जात अडकलेला मागासवर्गीय, बहुजन समाज हवालदिल
अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्व मागासवर्गीय व बहुजन समाजाला विविध महामंडळाच्या वतीने देण्यात आलेले कर्ज सरकारने माफ करण्याची मागणी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव काते यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन काते यांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना दिले.

शहरातील बंधन लॉन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय वयोश्री योजनेतंर्गत लाभार्थ्यांना विविध साहित्य वाटप कार्यक्रमात त्यांनी खासदार विखे यांची भेट घेतली. राज्य व केंद्र सरकारद्वारा संचलित महामंंडळे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, महात्मा फुले विकास महामंडळ, कर्मकार विकास महामंडळ, ओबीसी विकास महामंडळ, मौलाना आझाद विकास महामंडळ, वसंतराव नाईक विकास महामंडळ, जिल्हा उद्योग विकास केंद्र, आदिवासी विकास महामंडळ, खादी ग्रामोद्योग महामंडळ, महापालिकेचे दीनदयाळ अंतोदय योजना आदी महामंडळातून मागासवर्गीय व बहुजन समाजाला कर्ज देण्यात आलेले आहे. कोरोना काळात गेलेल्या नोकर्या, बेकारी व महागाईमुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. कर्जदार या महामंडळाचे हप्ते भरुन वैतागले आहे. हप्ते थकल्यस होणारे दंड, बँकेचे वसुली अधिकारी येऊन कर्जदारांना त्रास देत आहे. शेतकरी वर्गाला बर्याच वेळा कर्जमाफी दिली आहे.
त्याप्रमाणे सर्वसामान्य मागासवर्गीय व बहुजन समाजातील कर्जदारांना कर्जपाशातून मुक्ती मिळण्यासाठी भाजप सरकारने पुढाकार घेण्याचे निवेदनात म्हंटले आहे.
यापुर्वी विविध महामंडळाचे कर्ज माफ होण्यासाठी अनेकवेळा राज्य सरकारकडे पाठपुरावा करुन आंदोलने करण्यात आली. मात्र त्याची दखल घेण्यात आली नव्हती. कर्जात अडकलेला मागासवर्गीय, बहुजन समाज हवालदिल झालेला असल्याचे स्पष्ट करुन विविध महामंडळाच्या वतीने देण्यात आलेले कर्ज माफ करण्याची मागणी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष काते यांनी केली आहे.
