शिवकालीन वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष; शिवचरित्रातून विद्यार्थ्यांना स्वाभिमान, शौर्य आणि संस्कारांचा संदेश
शिवगर्जना, पोवाडे आणि समूह नृत्यांनी विद्यालय परिसर दुमदुमला
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्था संचलित कापड बाजार येथील लक्ष्मीभाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्यासह शिवकालीन वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यावेळी माध्यमिक विभागाच्या प्राचार्या छायाताई काकडे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका लक्ष्मीताई आहेर, सांस्कृतिक विभाग प्रमुख एस. एम. गारुडकर, श्रीमती एस. व्ही. दोमल, ज्येष्ठ शिक्षक महादेव भद्रे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिवगर्जना सादर करून वातावरणात उत्साह संचारला. समूह नृत्य, देशभक्तिपर गीते, प्रेरणादायी पोवाडे आणि प्रभावी भाषणांमधून विद्यार्थ्यांनी शिवरायांचा पराक्रम, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेचा इतिहास प्रभावीपणे उलगडला. काही विद्यार्थ्यांनी अफजलखान वध, सिंहगड विजय यांसारख्या ऐतिहासिक प्रसंग आपल्या सादरीकरणातून जीवंत करुन उपस्थितांची मने जिंकली.
प्राचार्या छायाताई काकडे म्हणाल्या की, “छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजा नव्हते, तर ते आदर्श नेतृत्व, दूरदृष्टी, पराक्रम आणि सुशासन यांचे प्रतीक होते. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची स्थापना करून संपूर्ण जगाला प्रेरणा दिली. आजच्या पिढीने शिवरायांकडून स्वाभिमान, धैर्य, शिस्त आणि राष्ट्रप्रेम या मूल्यांचा वारसा घेण्याचे त्यांनी सांगितले.
मुख्याध्यापिका लक्ष्मीताई आहेर म्हणाल्या की, “राजमाता जिजाऊंच्या संस्कारातून घडलेले शिवाजी महाराज हे आदर्श पुत्र, आदर्श राजा आणि आदर्श मानव होते. लहानपणापासूनच जिजाऊंनी त्यांच्यात देशप्रेम, न्यायप्रियता आणि पराक्रमाची बीजे रोवली. त्यामुळेच शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करून जनतेला सुरक्षित आणि सन्मानाचे जीवन दिले. शिक्षणासोबतच चारित्र्य घडविणे हे विद्यालयाचे कर्तव्य आहे. शिवरायांचे विचार आत्मसात करून प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आयुष्यात यशाचे शिखर गाठावे, हेच ध्येय घेऊन वाटचाल करण्याचे त्यांनी आवाहन केले.
