शिक्षकांच्या प्रलंबीत प्रश्नांवर चर्चा
अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षकांच्या प्रलंबीत प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या शिष्टमंडळाने घेतली ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. शिष्टमंडळाने आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास मंत्री महाजन यांची मुंबईला भेट घेऊन शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
या शिष्टमंडळामध्ये शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, शिक्षक नेते रावसाहेब रोहकले, कार्याध्यक्ष भरत मडके, संपर्क मंत्री राजेंद्र नांद्रे, रत्नागिरी जिल्हा शिक्षक नेते बळीराम मोरे, दिलीप महाडिक, अमोल भोबस्कर, जिल्हा शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस संतोष सुर्वे, संजय सुर्वे, रूपेश जाधव, सुशील वाघमारे, संदेश पालकर, विनायक ठुबे आदी पदाधिकारींचा समावेश होता.
ग्रामविकास मंत्री महाजन यांच्याशी झालेल्या भेटीमध्ये राज्यातील शिक्षकांना वैद्यकीय बिले घेण्यासाठी ज्या अडचणी येतात त्यासाठी शिक्षकांना कॅशलेस विमा योजना लागू करणे व त्याची अंमलबजावणी येत्या दोन महिन्यात करावी, शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना 10:20:30 लागू करावी, शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करण्यात यावी व कपात केलेले घर भाडे त्यांना पुन्हा परत करण्याचे आदेश देण्याबाबत, एमएससीआयटी अंतर्गत ज्या सेवानिवृत्त शिक्षकांची रक्कम जमा केलेली आहे ती त्यांना परत मिळावी व एमएससीआयटीला मुदतवाढ द्यावी, जिल्हा अंतर्गत बदली टप्पा सहा मध्ये सुधारणा व शैक्षणिक वर्ष 2023 जिल्हा अंतर्गत व आंतर जिल्हा बदली प्रक्रिया तातडीने सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
बदली टप्पा एक ते पाच पूर्ण झाल्याने सहावा टप्पा त्यातील त्रुटी दूर करून ज्या शिक्षकांचे दुर्गम क्षेत्रामध्ये बदली टप्पा सहा मध्ये बदली होणार आहे. अशा शिक्षकांना शिक्षक भरती झाल्यानंतर नव्याने बदलीसाठी एक संधी देण्यात येईल व नव्याने येणार्या शिक्षकांना संबंधित ठिकाणी रुजू होण्यास परवानगी देण्यात येईल, यावर सविस्तर चर्चा झाली आहे. मात्र परिषदेच्या शिष्टमंडळाने बदली टप्पा सहा स्थगित करण्यावरती ठाम आहे. बदली टप्पा सहा संदर्भात कायदेशीर बाबीचा विचार करून पुढील आठवड्यात धोरणात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन ग्रामविकास मंत्री महाजन यांनी शिष्टमंडळास दिले.