सर्व क्षेत्रातील संघटित व असंघटित कामगारांच्या न्याय हक्कासाठी संघटना कार्य करणार -ओंकार काळे
कामगार चळवळीला ऊर्जित अवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न
अहमदनगर (प्रतिनिधी)- कामगारांच्या कल्याण, संरक्षणासाठी व त्यांना कामगार कायद्याप्रमाणे सर्व लाभ मिळण्याच्या उद्देशाने धडक जनरल कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. सर्व क्षेत्रातील संघटित व असंघटित कामगारांच्या न्याय हक्कासाठी ही संघटना कार्य करणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ओंकार काळे यांनी दिली. तर लवकरच कामगारांच्या प्रश्नावर जिल्हास्तरीय मेळावा घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
संघटनेच्या माध्यमातून कामगारांच्या कामाची परिस्थिती, फायदे, कामाचे तास आणि वेतन यावर वाटाघाटी करून कामगारांच्या हक्काचे रक्षण करणार आहे. सध्याच्या परिस्थितीत अनेक कामगार संघटना कामगारांच्या हिताच्या कार्याऐवजी कारखानदारांसोबत हात मिळवणी करून कामगारांना न्याय हक्कापासून वंचित ठेवण्याचे कार्य करत आहे. कामगार चळवळीला ऊर्जित अवस्था निर्माण करुन कामगारांच्या न्याय, हक्कासाठी संघर्ष केले जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
ओंकार काळे म्हणाले की, कंत्राटी निर्मूलन कायदा 1970 ची अंमलबजावणी करण्यासाठी संघटना आग्रही आहे. अनेक कारखाने व इतर आस्थापनांकडे शंभरपेक्षा जास्त कामगार असताना, या कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. कामगार कायदा 1948 प्रमाणे किमान वेतन कायद्याची अंमलबजावणीकडेही प्राधान्याने लक्ष दिले जाणार असून, या कायद्याप्रमाणे त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी संघटना भूमिका बजावणार आहे. ठराविक कामगार संघटनांची मक्तेदारी मोडीत काढत कामगारांचे आर्थिक शोषण, महिलांना समान वेतन याबाबींकडे गांभीर्याने लक्ष दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कामगारांना पगारी सुट्टया, प्रसूती रजा, औषध उपचार विमा, भविष्य निर्वाह निधी या लाभापासून वंचित असलेल्या कामगारांसाठी संघटना कार्य करणार आहे. संघटनेची कायदेशीर नोंदणी करण्यात आली असून, रुग्णालयातील कामगार, हॉटेल कामगार, सुरक्षा रक्षक, कारखाने, स्वायत्त संस्था, विटभट्टी कामगार, घरेलू कामगार, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, असंघटित कामगार, कापड दुकानातील कामगार, ग्रामपंचायत कर्मचारी ज्या ठिकाणी 20 पेक्षा जास्त कामगार काम करतात अशा ठिकाणांच्या कामगारांचे संघटन करण्याचे काम सुरु करण्यात आले असल्याचे धडक जनरल कामगार संघटनेच्या वतीने म्हंटले आहे. संघटित व असंघटित सर्वच क्षेत्रातील कामगारांनी संघटनेचे सदस्यत्व घेऊन कामगार चळवळ गतीमान करण्याचे आवाहन काळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 8421840900 यांना संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.