युवक काँग्रेस दोन्ही खून प्रकरणातील मयत युवकांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी -मोसीम शेख
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील बहुचर्चित ओंकार भागानगरे व अंकुश चत्तर यांच्या निर्घृण खून प्रकरणात सुरु असलेल्या राजकारणाचा युवक काँग्रेसच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. तर या दोन्ही खून प्रकरणातील मयत युवकांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी युवक काँग्रेस असल्याची भूमिका युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोसीम शेख यांनी व्यक्त केली आहे.

माळीवाडा येथील युवक ओंकार भागानगरे व सावेडी येथील अंकुश चत्तर यांचा अलीकडच्या काळामध्ये दोन गटांमधील आपसातील वादातून निर्घृण खून करण्यात आला. सदर घटना शहरातील गुन्हेगारीची तीव्रता दर्शवते. सदर घटनेबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजप पदाधिकारी यांनी देखील तक्रार केली आहे. तसेच पावसाळी अधिवेशनामध्ये माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लक्षवेधी प्रश्न मांडून दोन्ही खून खटल्यातील कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यामध्ये कुठलाही राजकीय, धार्मिक विचार न करता ना. थोरात यांनी विधानसभेत आवाज उठवला असल्याचे युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष शेख यांनी स्पष्ट केले आहे.
अंकुश चत्तर हा पुरोगामी विचारसरणी मानणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी होता. तर ओंकार भागानगरे हा पैलवान होता. दोन्ही खून प्रकरणाचे खटले न्यायप्रविष्ट असून, आरोपी हे न्यायालयीन कोठडीत आहेत. याबाबतचे राजकारण न करता, मृत्यू झालेल्या युवकांच्या कुटुंबीयांना आधार देण्याची गरज आहे. आरोपींना शिक्षा देण्याची जबाबदारी न्यायालयाची आहे. याबाबतीत कुठलेही राजकारण करुन आरोपींना पाठीशी घालणे, मयताच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करुन सोशल मीडिया व प्रसार माध्यमात टीका टिप्पणी करणे, आरोप-प्रत्यारोप करणे हे निषेधार्ह असल्याचे म्हंटले आहे.
काँग्रेस पक्ष हा समता, संयम व वंचितांना आधार देणारा व अहिंसेचे समर्थन करणारा पक्ष आहे. शहरात झालेले दोन्ही हत्याकांड दुर्देवी असून, यामध्ये मयत झालेल्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात काँग्रेस युवकचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी असल्याचेही शेख यांनी म्हंटले आहे.