आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते गायकवाड यांना खंडणीसाठी खुनाच्या धमकी सत्राचा तपास करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन व आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांना दुसर्यांदा खंडणीसाठी खुनाच्या धमकीचे पत्र मिळाले असताना शहरातील विविध पक्ष, आंबेडकर चळवळीतील संघटनांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन याप्रकरणी त्वरीत तपास करुन आरोपींना अटक करावी व गायकवाड यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली.
यावेळी भाऊसाहेब पगारे, सुरेश बनसोडे, रोहित आव्हाड, कारभारी जावळे, सुनिल क्षेत्रे, सुनिल शिंदे, जयंत गायकवाड, अमित काळे, नितीन कसबेकर, सुजय म्हस्के, यशवंत भांबळ, विनोद भिंगारदिवे, कौशल गायकवाड, संजय साळवे, प्रमोद सुर्यवंशी, भिमराव पगारे, विशाल भिंगारदिवे, अनंत लोखंडे, हरीश अल्हाट, श्रीकांत हिवाळे, शैनेश्वर पवार, महादेव भिंगारदिवे, अजय पाखरे, राजू वाघ, दया गजभिये आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील बहुजन व आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांना 20 सप्टेंबर रोजी पुन्हा पोस्टाने खंडणीसाठी खुनाचे धमकी पत्र आले आहे. ही घटना दुसर्यांदा घडत असल्याने त्याचे गांभीर्य पोलिसांनी ओळखून तात्काळ तपास करण्याची गरज आहे. चळवळीतल्या ज्येष्ठ नेत्याला खंडणीसाठी अशा पध्दतीने खुनाचे धमकी पत्र येणे, निषेधार्ह असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
यापूर्वी अशोक गायकवाड यांना खुनाचे धमकी पत्र आले होते. त्याचा तपास तोफखाना पोलीस स्टेशनच्या अधिकार्यांनी गांभीर्याने घेतला नसल्याने पुन्हा दुसरी धमकी आली आहे. पहिल्या धमकी प्रकरणानंतर पोलीसांनी केलेला तपास अहवाल तपासून पहावा, धमकीचे पत्रात ज्यांची नावे आहेत त्यांचे फोनची सीडीआर तपासणी करुन चौकशी व्हावी, सावेडी पोस्ट ऑफिस जवळील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घ्यावा, हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) यांच्याकडे द्यावा, आरोपी सापडे पर्यंत अशोक गायकवाड यांना पोलीस संरक्षण द्यावे व रात्री त्यांच्या घराजवळ गस्त करण्याची मागणी विविध पक्ष, आंबेडकर चळवळीतील संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. या प्रकरणी योग्य कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
