उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश युवती विभागाच्या विधी कक्ष प्रमुखपदी नगरच्या ॲड. अंजली आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या हस्ते ॲड. आव्हाड यांना मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते.

ॲड. अंजली आव्हाड यांच्याकडे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी होती. त्यांनी पक्षात युवतींचे चांगले संघटन उभे करुन, युवतींच्या विविध प्रश्नांवर उत्तमपणे कार्य केले. महाविद्यालयीन युवतींचे शैक्षणिक प्रश्न, आरोग्याचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीकोनाने व युवतींच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविले. युवतींसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर घेऊन त्यांना दिशा देण्याचे कार्य केले.
तर महाविद्यालयीन मुलींची होणारी छेडछाड रोखण्यासाठी व त्यांच्या संरक्षणासाठी सातत्याने पुढाकार घेऊन कार्य केले. त्यांनी युवतींसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन व त्यांचा विधी संदर्भात असलेल्या अभ्यासाचा फायदा युवती विभागाला मिळण्यासाठी त्यांची युवती विभागाच्या विधी कक्ष प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल आमदार संग्राम जगताप, आमदार अरुणकाका जगताप व राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.