पारंपारिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेत भाविकांचा सहभाग
पोतराजांनी केला लक्ष्मीमातेचा जयघोष
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडी येथे लक्ष्मीआई यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रामवाडी यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रामवाडी परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये पारंपारिक वाद्यांच्या गजरात पोतराजसह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घोड्यांच्या बग्गीत असलेली लक्ष्मीमातेच्या मुर्तीने सर्वांचे लक्ष वेधले. भंडार्याची उधळण करीत भाविकांनी लक्ष्मीमातेचा जयघोष केला.
नगरसेवक सचिन जाधव व भाऊसाहेब उनवणे यांच्या हस्ते भाविकांसाठी आयोजित केलेल्या भंडार्याचे वाटप करण्यात आले. तर विकी इंगळे, सागर मुर्तडकर, भैय्या गंधे यांच्य हस्ते नारळ वाढवून शोभायात्रेचा प्रारंभ करण्यात आला. संबळ, हलगी, ढोल व ताशांच्या निनादात पोतराजांनी स्वत:वर आसूडचे फटके ओढले. भाविकांसह युवकांनी भक्तीगीतांवर ठेका धरला होता. पारंपारिक वाद्यांनी संपुर्ण परिसर दणाणून निघाला. ही शोभायात्रा मंगलगेट, सर्जेपुरा, अप्पूहत्ती चौक येथून मार्गक्रमण होऊन रामवाडी येथे समारोप झाला.

भाविकांसह रामवाडी परिसरातील नागरिकांनी भंडार्याचा लाभ घेतला. हा उत्सव पार पाडण्यासाठी प्रकाश वाघमारे, दीपक सावळे, सागर साठे, दीपक सरोदे, अश्विन खुडे, सतीश साळवे, संजू परदेशी, अशोक भोसले, मयूर चखाले, पप्पू पाथरे, गणेश ससाणे, पोतराज संघटनेचे बबन लोखंडे, सुनील चांदणे, भाऊसाहेब उडाणशिवे, किरण खुडे, लखन लोखंडे, विशाल वैरागर यांनी परिश्रम घेतले.