• Fri. Mar 14th, 2025

रात्र शाळेच्या विद्यार्थ्यांना संगणक साक्षरतेसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा समारोप

ByMirror

Apr 13, 2023

फिरत्या संगणक लॅबद्वारे दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी घेतले संगणकाचे धडे

संगणकज्ञान ही काळाची गरज -डॉ. पारस कोठारी

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात दिवसा काम करुन रात्र शाळेत शिक्षण घेणार्‍या दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मासूम संस्थेच्या मुंबई येथून आलेल्या फिरत्या संगणक लॅबच्या (डिजीटल बस) माध्यमातून संगणकाचे मोफत बेसिक प्रशिक्षण देण्यात आले. ज्युनिअर कॉलेज भाई सथ्था नाईट हायस्कूल व मासूम संस्था (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने तर एलकेम (ब्लू स्टार कंपनी) यांच्या सहकार्याने दहा दिवस चाललेल्या या संगणक प्रशिक्षणाचा समारोप नुकताच झाला.


हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरिष मोडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी सहसचिव ज्योती कुलकर्णी, स्वागताध्यक्ष अजित बोरा, उपकार्याध्यक्ष जगदीश झालानी, रात्रशाळेचे चेअरमन डॉ. पारस कोठारी, शाळा समिती सदस्य प्रदीप मुथा, प्राचार्य सुनिल सुसरे आदींसह शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक श्यामसुंदर सिंग, डिजीटल बसचे चालक संजय कुटीनो, प्रकल्प प्रमुख अशोक चिंधे यांचा हिंद सेवा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
शिरिष मोडक म्हणाले की, या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षणाचे उद्देश साध्य होणार आहे. संगणकीय शिक्षणातून मुलांचे भवितव्य घडणार असून, होतकरु युवकांचा या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. संगणकीय शिक्षणाची गंगा दारोदारी आल्याने युवकांना संगणक साक्षर होण्यास सहाय्य झाले असल्याचे सांगितले. उपस्थितांनी देखील आपल्या भाषणात या उपक्रमाचे महत्त्व विशद केले.


डॉ. पारस कोठारी यांनी संगणकज्ञान ही काळाची गरज बनली असून, होतकरु विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. या उपक्रमासाठी बारिक लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. प्राचार्य सुनिल सुसरे यांनी राबविण्यात आलेला उपक्रम हा प्रायोगिक तत्त्वावर पार पडला. मासूम संस्थेच्या माध्यमातून वर्षभर डिजीटल बस उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न सुरु असून, याद्वारे विद्यार्थ्यांना ग्राफिक्स डिजाईन, वेब डिजाईन, डिजीटल साक्षरतेचे अ‍ॅडव्हान्स प्रशिक्षण देण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.


मासूम संस्थेच्या संचालिका निकिता केतकर, वरिष्ठ कार्यक्रम प्रमुख कमलाकर माने व कार्यक्रम प्रमुख संदीप सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील भाई सथ्था नाईट हायस्कूल व रामकरण सारडा विद्यार्थी गृहातील विद्यार्थ्यांना संगणकाचे बेसिक प्रशिक्षण देण्यात आले. याप्रमाणे भिंगार नाईट हायस्कूल व सरस्वती मंदिर नाईट हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. रात्र प्रशालेतील विद्यार्थ्यांना संगणकीय युगाच्या प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. शैक्षणिक सुविधा, प्रोजेक्टर व वातानुकूलित असलेल्या डिजिटल बसमध्ये 14 संगणक संच व एकाच वेळी 28 विद्यार्थी बसण्याची क्षमता आहे. सकाळी रात्र शाळेचे विद्यार्थी राहत असलेल्या भागात जाऊन तर संध्याकाळी शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देण्यात आले. संस्थेचे कार्याध्यक्ष अनंत फडणीस, मानद सचिव संजय जोशी, जेष्ठ मार्गदर्शक ब्रिजलाल सारडा व सर्व संचालकांनी या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या शताब्दी महोत्सवा निमित्त हा उपक्रम राबविण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *