कारवाई करण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी
अन्यथा ग्रामस्थांसह गावातील मंदिरात चक्री उपोषण
अहमदनगर (प्रतिनिधी)- अवैध दारु व्यवसाय बंद होण्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार व पाठपुरावा करुन देखील कारवाई होत नसल्याने मौजे पोखरी (ता. पारनेर) येथील संतप्त ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. ग्रामस्थांच्या वतीने अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीने अवैध दारु व्यवसाय त्वरीत बंद करण्याची मागणी केली आहे. अन्यथा गुरुवारी (दि.6 ऑक्टोबर) चक्री उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या मागणीचे निवेदन पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना देण्यात आले. यावेळी समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे, पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे आदी उपस्थित होते.
पोखरी गावात सुरु असलेले अवैध दारु व्यवसाय बंद होण्यासाठी ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाशी अनेक वेळा पत्र व्यवहार करूनही अर्थपूर्ण संबंधामुळे कारवाई होत नसल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. दारू व्यवसायामुळे दारू पिणार्यांचे प्रमाण अधिक वाढले असून, युवा वर्ग देखील याकडे ओढला जात आहे. घरातील पुरुष दारुच्या आहारी गेल्याने त्या व्यक्तींच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली अहे. दारुमुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत असून, पोखरी ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासनास पत्र व्यवहार करून देखील पोलीस प्रशासनाने अवैध दारु व्यावसायिकांवर कारवाई केली जात नाही. दिवसाढवळ्या गावात अवैध दारु विक्री सुरु असून, ती त्वरीत बंद न केल्यास गावातील रंगदास स्वामी मंदिरात ग्रामस्थांसह चक्री उपोषण करण्याचा इशारा अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने देण्यात आला आहे.