मासिक पाळी लपविण्याचा विषय नसून, तो समजून घेण्याचा विषय -शुभांगी माने
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर यतीमखाना ॲण्ड बोर्डिंग या संस्थेत अनाथ व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या मुलींना मासिक पाळी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. व्याख्यात्या शुभांगी माने यांनी संस्थेतील किशोरवयीन मुलींशी मासिक पाळी या विषयी मुक्त संवाद साधला.

यतीमखाना ॲण्ड बोर्डिंग या संस्थेत अनाथ व गरजू घटकातील मुले-मुली शिकत आहे. सदर संस्था दानशूर व्यक्तींच्या देणगीवर चालत असून, संस्थेमध्ये मुला-मुलींच्या व्यक्तिमत्व विकास व जीवन कौशल्याचा विचार करून विविध उपक्रम राबवले जातात. याचाच एक भाग म्हणून संस्थेतील किशोरवयीन मुलींना मासिक पाळी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले होते.
शुभांगी माने यांनी किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळी याविषयी असणारे समज, गैरसमज याबद्दल मुलींशी चर्चा करुन त्यांना मार्गदर्शन केले. मासिक पाळी दरम्यान आरोग्याप्रती जागरुक राहण्याचा सल्ला दिला. तर मासिक पाळी हा लाजण्याचा, हसण्याचा व लपविण्याचा विषय नसून, तो समजून घेण्याचा विषय आहे. मासिक पाळीमुळे स्त्रीला एक नवीन ओळख मिळते ती म्हणजे आई. अर्थातच मासिक पाळी चांगली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सदरील व्याख्यानाने प्रभावित होऊन मुलींनी आपल्या मनातील मासिक पाळी विषयी प्रश्न मांडले. त्या प्रश्नांची उत्तरे देत व्याख्यानात मुलींशी मोकळा संवाद साधण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रणय राऊत, गणेश जामोदकर, कोमल भापकर, संस्थेचे कर्मचारी गुफरान शेख, हारून शेख, अंजुम मॅडम आदींसह संस्थेतील विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.