• Wed. Oct 15th, 2025

मोहरमच्या सातव्या दिवसानंतरही बारा इमाम कोठला परिसराची दुरावस्था

ByMirror

Jul 26, 2023

राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे साहेबान जहागीरदार यांनी शहर अभियंतांना धरले धारेवर

भाविकांना चिखलमय रस्ते व पाण्याच्या डबक्यातून वाट काढण्याची वेळ

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात मोहरम उत्सवाला प्रारंभ होवून सात दिवस लोटून देखील बारा इमाम कोठला परिसराची महापालिकेच्या वतीने स्वच्छता व खड्डेमय रस्त्याची पॅचिंग न झाल्याने भाविकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. कोठला येथे दर्शनास येणाऱ्या भाविकांना चिखलमय रस्ते व पाण्याच्या डबक्यातून वाट काढण्याची वेळ आली असताना राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून प्रत्यक्ष परिसराची पहाणी करायला लावण्यात आली.


मनपाचे शहर अभियंता मनोज पारखे व उप अभियंता श्रीकांत निंबाळकर यांनी कोठला परिसरातील दुरावस्थेची पहाणी केली. राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार यांनी दरवर्षी मोहरम सुरु झाल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग येत असून, प्रत्येक वेळी वारंवार ही दुरावस्था दूर करण्याची मागणी करावी लागत असल्याचे स्पष्ट करुन अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले. तर तात्काळ रस्त्याची पॅचिंग सुरु करण्याची मागणी केली.


शहर अभियंता पारखे यांनी कोठला परिसराची स्वच्छता, रस्त्याची पॅचिंग व लाईटीचा प्रश्‍न 24 तासात सोडविण्याचे आश्‍वासन यावेळी दिले. याप्रसंगी माजी नगरसेवक सादिक जहागीरदार, शाहबाज बॉक्सर, तन्वीर पठाण, तन्वीर शेख, शाहनवाज शेख, साजिद जहागीरदार, दस्तगीर जहागीरदार आदी उपस्थित होते.


प्रत्येक वर्षी महापालिकेकडे मोहरम सुरु झाल्यानंतर रस्ता पॅचिंग व स्वच्छतेची मागणी करावी लागते. मोहरम सुरु होण्यापूर्वीच मनपा प्रशासनाने तातडीने हे प्रश्‍न मार्गी लावण्याची गरज आहे. कोठला येथील खड्डेमय रस्ते, अस्वच्छता, लाईट व पाण्याचा प्रश्‍न आयुक्तांकडे मांडण्यात आला होता. शांतता कमिटीच्या बैठकीत सदर प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. मात्र सात दिवस उलटून देखील हे प्रश्‍न मार्गी लागत नसल्याने आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला. आमदार जगताप यांनी आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर या परिसराची शहर अभियंता यांनी पहाणी केल्याची माहिती साहेबान जहागीरदार यांनी दिली. तर कोठला परिसरात आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून 25 लाख रुपयांचे काँक्रिटीकरणाचे काम मंजूर झाले असून, मोहरमनंतर या कामाला प्रारंभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *