मैदानातील अचूक वेध घेणारे खेळाडूंनी महाराजांच्या शौर्याला केले वंदन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शस्त्रविद्येचे जनक व स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर रायफल शूटिंग क्लबच्या वतीने उत्साहपूर्ण पदयात्रा काढून महाराजांना अभिवादन करण्यात आले. मैदानात अचूक नेमबाजीसाठी ओळखले जाणारे हे खेळाडू रस्त्यावर उतरून शिवरायांच्या शौर्य आणि पराक्रमाला वंदन केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, एकविध जिल्हा क्रीडा संघटना तसेच जिल्हा क्रीडा संकुल, अहिल्यानगर येथील विविध खेळ प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या पदयात्रेत खेळाडूंनी हातात भगवे झेंडे व घोषवाक्यांचे फलक घेऊन “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी वातावरण दणाणून सोडले.
या पदयात्रेत शहराचे आमदार संग्राम जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, क्रीडा अधिकारी विशाल गर्जे, प्रियंका खिंडारे, संतोष वाबळे तसेच राष्ट्रीय प्रशिक्षक अलीम शेख, ऋषिकेश दरंदले, सागर फाटके आदींसह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ शासकीय अधिकारी सहभागी झाले होते.
पदयात्रेदरम्यान शिवरायांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारे संदेश देण्यात आले. नेमबाजी हा शिस्त, एकाग्रता आणि धैर्याचा खेळ असून, शिवरायांच्या युद्धकौशल्यातून प्रेरणा घेऊन खेळाडूंनी आपल्या क्रीडा क्षेत्रात यश संपादन करावे, असा संदेश यावेळी देण्यात आला. या उपक्रमामुळे क्रीडा आणि शिवभक्ती यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. रायफल शूटिंग क्लबच्या खेळाडूंनी आपल्या शिस्तबद्ध आणि संघटित सहभागातून शिवजयंती साजरी करताना सामाजिक बांधिलकीही जपली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून राष्ट्रभक्तीची शपथ घेतली.
