लव्ह जिहादच्या नावाखाली खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप
मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन दिले निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- उंबरे (ता. राहुरी) येथे धार्मिक स्थळावर हल्ला करणारे व लव्ह जिहादच्या नावाखाली खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली. सोमवारी (दि.31 जुलै) मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले. तर जिल्ह्यात विविध घटनांमध्ये मुस्लिम समाज व त्यांच्या धार्मिक स्थळांना टार्गेट केले जात असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.
याप्रसंगी नगरसेवक समद खान, सामाजिक कार्यकर्ये मुजाहिद (भा) कुरेशी, माजी नगरसेवक सादिक जहागीरदार, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागिरदार, हाजी वहाब सय्यद, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते सय्यद साबिर अली, सय्यद मुजाहिद, अमीर सय्यद, खालिद शेख, तन्वीर शेख, आबिद दुल्हेखान, शाहनवाज शेख, शाकिर शेख, जाबिर शेख, मोईन सय्यद, अयनुल शेख आदी उपस्थित होते.
राहुरी तालुक्यातील उंबरे या गावात बहुसंख्य असलेल्या एका गटाने मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळावर हल्ला चढविला व पवित्र ग्रंथाचा अवमान केला. या घटनेस थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचा हात मोडून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेची तक्रार संबंधित फिर्यादीने दिली व पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. परंतु हल्ला करणाऱ्या गटांनी या गुन्ह्याला बगल देण्यासाठी काही अल्पवयीन मुलींना पुढे करून खोटा लव्ह जिहाद व धर्मांतरणाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून निष्पाप लोकांना यामध्ये गोवले. यात महिला व फिर्यादी यांनाच आरोपी ठरविण्यात आले आहे. ही कृती अत्यंत निंदनीय असून, पोलीस यंत्रणेने घटनेची सत्यता पडताळून अटक सत्र करण्यात येणे अपेक्षित आहे, परंतु तसे घडले नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. राहुरी तालुक्यातील गुहा येथील धार्मिक स्थळावरून तणावाच्या घटना, शेवगाव येथील मशिदीवर हल्ला, संगमनेर तालुक्यातील समानपूर येथे निष्पाप मुस्लिम समाजाच्या घरावर केलेला हल्ला, उंबरे (ता. राहुरी) येथील धार्मिक स्थळावर केलेला हल्ला, कोपरगाव मध्ये धर्मांतराचे दाखल झालेले खोटे गुन्हे अशा विविध घटनांतून मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचे व त्यांना विनाकारण त्रास देण्याचे सत्र सुरु असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
उंबरे प्रकरणाची उच्चस्तरीय निष्पक्ष चौकशी करावी, खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई करावी व दोन धर्मामध्ये वारंवार द्वेष पसरविणाऱ्या समाजकंटकांवर व संघटनावर पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
शहरातील मोहरम उत्सव शांततेत होण्यासाठी महत्त्वाची भूमिका घेणाऱ्या पोलीस प्रशासनाचे मुस्लिम समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले. तर मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने विभागीय पोलीस उपाअधीक्षक अनिल कातकडे, तोफखानाचे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे व कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचा सत्कार केला. मोहरमच्या दहा दिवस चौका-चौकात चोख पोलीस बंदोबस्त ठेऊन सवारी स्थापनेपासून ते विसर्जन मिरवणूकीत पोलीस प्रशासनाने सहकार्याची भूमिका ठेऊन मोहरम उत्सव उत्साहात साजारा होण्यासाठी मोलाची भूमिका बजावल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.