युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अहमदनगरच्या वतीने बेरोजगार युवकांना उद्योग-व्यवसायाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ई- टेंडरिंग, जेम पोर्टल व जीएसटी नोंदणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील ऐतिहासिक वास्तू संग्रहालयाच्या सभागृहात होणार्या या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन विभागीय अधिकारी (नाशिक) अलोक मिश्रा व प्रकल्प अधिकारी तात्यासाहेब जिवडे यांनी केले आहे.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र महाराष्ट्र शासन अंतर्गत कार्यरत स्वायत्त प्रशिक्षण संस्था असून, या कार्यालयामार्फत उद्योग वाढीसाठी नाविन्य पूर्ण विविध प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. उद्योजकांना व उद्योग सुरु करणार्यासाठी चार दिवसीय ई-टेंडरिंग, जेम पोर्टल व जीएसटी नोंदणी यावर ई टेंडर गुरु हर्षद बार्गे मार्गदर्शन करणार आहेत. शनिवारी (दि.22 जुलै) रोजी या कार्यशाळेला प्रारंभ होणार आहे. यामध्ये ई-निविदा प्रक्रिया ओळख, ई-निविदा प्रक्रिया पद्धती, शासनाचे ई-टेंडरिंगचे मार्गदर्शक तत्त्वे, डिजिटल स्वाक्षरी म्हणजे काय, डिजिटल स्वाक्षरीसाठी अर्ज कसा करायचा, पीएसयू, सीपीएसयू आणि सरकारच्या आवश्यकतांचे मूल्यांकन कसे करावयाचे, कंपनी नोंदणी प्रक्रिया, ई-निविदा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, दस्तऐवजीकरणाचा लाइव्ह प्रात्याशिक, त्यासोबत जेम पोर्टल, पोर्टलवर आपली फर्म कशी नोंदणी करावी, जेम पोर्टलवर प्रात्यक्षिक, जीएसटी आणि त्याचा परिचय, जीएसटी नोंदणी प्रक्रिया, एमएसएमई ग्लोबल मार्ट बद्दल माहिती तसेच नव उद्योजकासाठी विविध शासकीय योजना व त्यांची अंबलबजावणी बाबत माहिती देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी, सुशिक्षित बेरोजगार, उद्योजक, कंत्राटदार बनू इच्छिणारे, बचत गटातील सदस्य, महाविद्यालयीन युवक-युवती यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत अधिक माहितीसाठी 9561737747/ 9975844418 या नंबरवर अथवा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, अहमदनगर महाविद्यालय जवळ, स्टेशन रोड येथे संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.
