• Mon. Jun 2nd, 2025

भाकपच्या राज्य सेक्रेटरीपदी नगरचे कॉ. सुभाष लांडे

ByMirror

Sep 21, 2022

पक्षाच्या राज्य अधिवेशनात घोषणा

45 वर्षानंतर भाकपचे राज्य सेक्रेटरीपद जिल्ह्याला

अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य अधिवेशनात कॉ. सुभाष लांडे यांची राज्य सेक्रेटरीपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. नुकतेच अमरावती येथे तीन दिवसीय राज्य अधिवेशन पार पडले. यामध्ये लांडे यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. तब्बल 45 वर्षानंतर राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे समजले जाणारे भाकपचे राज्य सेक्रेटरीपद अहमदनगर जिल्ह्याला मिळाले आहे.


या अधिवेशनात मावळते राज्य सचिव कॉ. तुकाराम भस्मे यांनी कॉ. सुभाष लांडे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्यास 87 जणांच्या नवीन कौन्सिलच्या बैठकीत चर्चेनंतर मान्यता देण्यात आली. कॉ. लांडे वयाच्या अठराव्या वर्षापासून शेवगाव तालुक्यात विद्यार्थी चळवळीत ओढले गेले. ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे सामान्य सभासद ते राज्य सचिव व नंतर त्यांनी राज्यध्यक्ष पदाची धुरा सांभाळली. त्यानंतर त्यांनी ऑल इंडिया यूथ फेडरेशनचे राज्य अध्यक्ष पदही भूषवले. त्यानंतर त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची पक्ष बांधणीचे काम केले. अहमदनगर जिल्हा सचिव म्हणून दहा वर्षे त्यांनी जबाबदारी सांभाळली. सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये समावेश असलेल्या शेवगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुभाष लांडे यांची निवड झाली होती.


भाकप पक्षाने त्यांना विधानसभेची दोनदा उमेदवारी दिली. तर पक्षाच्या राष्ट्रीय कौन्सिलचे दोन वेळा ते सदस्य राहिलेले आहे. मागील चार वर्षांपासून पक्षाचे सहसचिव म्हणून काम पाहत होते. विद्यार्थी दशेपासून डाव्या चळवळीत ओढले गेलेले कॉ. लांडे 35 ते 40 वर्षांपासून योगदान देत असून, त्यांची राज्य सेक्रेटरीपदी नियुक्ती झाली आहे. यापूर्वी जिल्ह्यात 1965 ते 1978 दरम्यान माजी आमदार कॉ. एकनाथराव भागवत यांनी राज्य सेक्रेटरीपद भूषवलेले असून, जिल्ह्याला 45 वर्षानंतर या पदाची संधी मिळाली आहे. तसेच कॉ. माधवराव गायकवाड, कॉ. गोविंद पानसरे, कॉ. डॉ. भालचंद्र कांगो, मनोहर देशकर, कॉ. तुकाराम भस्मे यांनी पद भूषविलेले आहे.


या अधिवेशनात 21 जणांचे राज्य कार्यकारिणीवर अहमदनगर जिल्ह्यातून भारतीय महिला फेडरेशनच्या राज्याध्यक्ष स्मिता पानसरे निवड करण्यात आली आहे. तर 87 जणांच्या राज्य कौन्सिलवर जिल्हा सेक्रेटरी अ‍ॅड. बन्सी सातपुते, संजय नांगरे, भारती न्यालपेल्ली, लक्ष्मण नवले, रामदास वागस्कर यांची निवड करण्यात आली आहे. सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *