• Sat. Mar 15th, 2025

भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे धडे

ByMirror

Mar 11, 2023

मुलींना स्वसंरक्षणाचे धडे काळाची गरज -छायाताई फिरोदिया

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. स्वसंरक्षणतंर्गत मुलींना कराटे, ज्युदो, लाठी-काठीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.


भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल व प्रियदर्शनी रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त हा उपक्रम घेण्यात आला. संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया व प्राचार्य उल्हास दुगड यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम पार पडला. यावेळी प्रियदर्शनी रोटरी क्लबच्या अध्यक्षा निलमणी गांधी, सदस्या वैशाली कोलते, लता भगत, ज्योती गांधी, विद्यालयाच्या उपप्राचार्या सुषमा चिटमील, पर्यवेक्षक रावसाहेब बाबर, रवींद्र शिंदे, आशा सातपुते आदींसह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


छायाताई फिरोदिया म्हणाल्या की, मुलींना स्वसंरक्षणाचे धडे, ही काळाची गरज बनली आहे. शाळेत विद्यार्थिनींना संस्कार, शिक्षण व स्वसंरक्षाणाचे धडे देऊन त्यांना स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर केले जात आहे. अंगावर आलेल्या दृष्ट प्रवृत्तीच्या हाताला निर्भयपणे रोखण्याचे काम मुली स्वसंरक्षणातून करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविकात नीलमणी गांधी यांनी महिला व युवतींसाठी प्रियदर्शनी रोटरी क्लबच्या माध्यमातून सुरु असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. शाळेच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.


शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या अंजली वल्लाकट्टी यांनी विविध प्रात्यक्षिके सादर करून मुलींना स्वतःचे संरक्षण करण्याचे धडे दिले. कोणताही कठीण प्रसंग आला तरी, प्रसंगावधान राखून स्वतः जवळ असणार्‍या हत्याररुपी अवयवांचा कसा उपयोग करावा? हे प्रात्यक्षिकातून दाखवून दिले. या कार्यक्रमास विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थिनी प्रणिती ठाणगे हिने मनोगतामध्ये या कार्यशाळेचा मुलींना होणारा उपयोग विशद केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमेय कानडे यांनी केले. विद्यालयाचे क्रीडा अध्यापक अरविंद आचार्य यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *