गंगा उद्यान जवळील फटाका मार्केटला नागरिकांचा प्रतिसाद
फटाके महाग, तरीही नागरिकांच्या हौसेला मोल नाही
अहमदनगर (प्रतिनिधी)- यंदा निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होत असताना, शहरासह उपनगरातील बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होत आहे. महागाईच्या झळा लागत असल्या तरीही दिवाळीत खास आकर्षण असलेल्या फटाक्यांची खरेदी जोरात सुरू आहे. सावेडी उपनगरातील गंगा उद्यान मागील उपनगर फटाका असोसिएशनच्या वतीने उभारण्यात आलेल्या फटाका मार्केटमध्ये खरेदीला सावेडी भागातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दिवाळीसाठी सर्वत्र उत्साह संचारला असून, फटाक्यांची बाजारपेठ देखील सजल्या आहेत. सुरसुरी, भुईचक्र, पाऊस, आपटी बॉम्ब, रॉकेट या पारंपरिक फटाक्यांसह बाजारात अनेक नवीन फॅन्सी फटाक्यांना मागणी आहे. आकाशात उडणार्या फटाक्यांचे नागरिकांमध्ये आकर्षण असून, आसमंत उजळून टाकणार्या फटाक्यांची चलती आहे.
कमी आवाज आणि फक्त रोषणाई करणार्या फटक्यांची देखील नागरिक मागणी करत असल्याची माहिती फटाका विक्रेते अर्जुन मदान यांनी दिली.
दिवाळी हा सण सर्व समाज व धर्मातील नागरिक साजरा करत असतात. दिवाळीत फटाक्यांची आर्थिक उलाढाल मोठी असून, यावर्षी फटाके महाग झाले असले तरीही नागरिकांच्या हौसेला मोल नसल्याचे खरेदीवरुन दिसत आहे.