पर्यावरण रक्षणासाठी 75 बिल्ववृक्षांची लागवड
पर्यावरण रक्षण ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी -गोरक्षनाथ गवते
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक पर्यावरण विकास सरकार, अहिल्यानगरच्या वतीने शहर परिसरात 75 बिल्ववृक्षांची लागवड करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला पर्यावरणप्रेमींसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रसंगी जागतिक पर्यावरण विकास सरकारचे राष्ट्रीय अध्यक्ष गोरक्षनाथ गवते, प्रकाश बागल, महेश मंडलिक, भाऊसाहेब मोरे, पोपटराव पठारे, निलेश साठे, नवनाथ गवते, नानासाहेब जिवरग आदी मान्यवर उपस्थित होते. वृक्षारोपणानंतर सर्वांनी वृक्ष संवर्धनाचे महत्त्व पटवून देत पर्यावरण संरक्षणाचा संकल्प केला.
गोरक्षनाथ गवते म्हणाले की, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणासोबतच त्यांचे संवर्धन आवश्यक आहे. शासन यासाठी प्रयत्न करत असले तरी नागरिकांनी देखील आपल्या सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याची काळजी घ्यावी. आजच्या काळात पर्यावरण रक्षण ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी झाली आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, बिल्ववृक्षाला धार्मिक, औषधी व पर्यावरणीय असे तिन्ही महत्त्व आहे. ऑक्सिजन निर्मितीसाठी तसेच वातावरणातील प्रदूषण शोषून घेण्यासाठी या वृक्षाचा मोठा उपयोग होतो. त्यामुळे यावर्षी संस्थेने विशेषतः बिल्ववृक्ष लागवडीवर भर दिला असल्याचे ते म्हणाले.
संस्था 2011 पासून पर्यावरण रक्षक उपक्रमम राबवत आहे. त्याअंतर्गत एक झाड एक विद्यार्थी, एक झाड एक व्यक्ती, कुऱ्हाड बंदी, डीजे बंदी, हुंडाबंदी, लोटा बंदी, आकडा बंदी, खाजगी सावकारकी बंदी, व्यसनमुक्ती अशा विविध सामाजिक चळवळी सातत्याने राबवल्या जात आहेत. यामुळे पर्यावरण व समाजरक्षणाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. वृक्षारोपण कार्यक्रमानंतर झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा अशा घोषणा देत जनजागृती करण्यात आली.