• Wed. Jan 21st, 2026

पद्मशाली स्नेहिता संघमच्या वतीने गुणवंतांचा गौरव

ByMirror

Jun 27, 2023

सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन ध्येय प्राप्तीकडे वळा -प्रा. रविंद्र काळे

अहमदनगर (प्रतिनिधी)- पद्मशाली स्नेहिता संघमच्या वतीने मागील शैक्षणिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू व विविध स्पर्धा परीक्षांसह दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. गुणवंतांना रोख रक्कम, आकर्षक भेटवस्तू, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.
कोर्ट गल्ली येथील सुयोग मंगल कार्यालयात शहर सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक दत्तात्रय रासकोंडा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅम्बिशन अकॅडमीचे संचालक रविंद्र काळे, डॉ. संभाजी पानसंबळ, एस.जे.के ब्युटी स्कूलच्या संचालिका सुमन श्रीगादी, स्नेहिता संघमच्या अध्यक्षा डॉ. रत्ना बल्लाळ उपस्थित होत्या.


प्रास्ताविकात डॉ. रत्ना बल्लाळ म्हणाल्या की, पद्मशाली स्नेहिता संघमच्या माध्यमातून समाजातील महिला एकत्र येऊन सामाजिक योगदान देत आहे. वर्षभर शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून गुणवंतांचा सन्मान करुन त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरु असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी सुरु असलेल्या विविध कार्याची माहिती दिली.


प्रा. रविंद्र काळे म्हणाले की, सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन ध्येय प्राप्तीकडे जाण्याचा प्रयत्न केल्यास जीवनात यश मिळवता येते. ज्ञानपीपासू वृत्ती, अचूक वेळेचे नियोजन, अमाप जिद्द, अपार कष्ट यावर यश अवलंबून असते. विविध करियरच्या संधी व व्यवसायाच्या वाटा याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. संभाजी पानसंबळ यांनी नापास झालं तरी खचून जाऊ नका, तर यशाने हुरळून जाता कामा नये. जीवनात मोठे ध्येय ठेऊन यश पादक्रांत करण्याचे त्यांनी सांगितले. सुमन श्रीगादी यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्राला करियरध्ये रुपांतर करता आले पाहिजे. बेरोजगारी वाढत असताना युवक-युवतींना कौशल्य निर्माण करणारे व्यावसायिक प्रशिक्षणाची गरज निर्माण झाली आहे. मुलींनी पार्लरच्या व्यावसायिक प्रशिक्षणातून आपल्या पायावर उभे राहण्याचे त्यांनी आवाहन केले.


पाहुण्यांचा परिचय साधना कोलपेक, रेखा वड्डेपेल्ली यांनी करून दिला. पुरस्काराची यादी वाचन पूजा म्याना, नीता बुरा यांनी केली. सत्काराला उत्तर देताना मानस कुंटला यांनी झालेल्या गौरवाने आनखी पुढे जाण्याची प्रेरणा व चांगले काम करण्याची जबाबदारी वाढली असल्याचे सांगितले.


कार्यक्रमासाठी सपना छिंदम, नीता बुरा, लक्ष्मी गुंडू, विजया गुंडू, रोहिणी पागा, सुवर्णा पुलगम, मोना मोरे, पूजा मैना, सीमा अंकाराम, निलिमा अडगटला, आरती छिंदम, कांचन कुंटला, हेमलता चिप्पा, रेखा गुरुड आदींसह महिला, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साईगीता सब्बन यांनी केले. आभार पल्लवी सुरम यांनी केले. यावेळी एस.एस. कम्युनिकेशन, गुंडू अम्मा साडी, गुंडू परिवार, सविता एक्कलदेवी, रेणुका खरदास, श्रीलता आडेप यांच्यातर्फे गुणवंतांना विशेष भेटवस्तू बक्षीस स्वरूपात देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *