विखे पाटील यांचे आश्वासन
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने विखे यांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- पत्रकार सन्मान योजनेतून ज्येष्ठ पत्रकारांना देण्यात येणारी पेन्शन आणि अन्य प्रलंबित मागण्यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्यस्तरीय बैठक घडवून आणली जाईल. त्यामध्ये हे प्रश्न मार्गी लावले जातील, अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने ज्येष्ठ पत्रकारांच्या पेन्शनमध्ये येणार्या अडचणी आणि अन्य मागण्यांसंबंधी विखे पाटील यांना निवेदन देण्यात आले. मराठी पत्रकार परिषदेच्या नाशिक विभागाचे सचिव मन्सूरभाई शेख, ज्येष्ठ पत्रकार दिलीप वाघमारे, सुरेश वाडेकर, प्रकाश कुलकर्णी यांनी यावेळी विखे पाटील यांच्याशी चर्चा केली. राज्य सरकारने पत्रकार सन्मान योजनेतून ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन देण्याची योजना सुरू केली आहे. मात्र, गेल्या अडीच-तीन वर्षांत नगर जिल्ह्यातील बोटावर मोजण्याएवढ्याच पत्रकारांना याचा लाभ मिळला आहे. किचकट अटी असल्याने अनेक ज्येष्ठ पत्रकार यापासून वंचित राहत असून, पात्रता असलेल्यांनाही पुन्हा पुन्हा कागदपत्रे सादर करावी लागत आहेत.

राज्यस्तरावर परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख आणि इतर पदाधिकारी यासाठी पाठपुरावा करीत आहेत, याकडे पत्रकारांनी विखे पाटील यांचे लक्ष वेधले.
यावर बोलताना विखे पाटील म्हणाले, की हा विषय आपण मुख्यमंत्र्यांकडे मांडू. परिषदेच्या राज्याच्या पदाधिकार्यांसोबत आपण मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊन यावर सविस्तर चर्चा घडवून आणू. गरज पडल्यास यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीतही चर्चा केली जाईल, असे आश्वासन विखे पाटील यांनी दिले.
