मुलांना मैदानी खेळाची आवड लागण्यासाठी व मुलींना स्वसंरक्षणासाठीचा उपक्रम
मोबाईलमध्ये अडकलेल्या पिढीला मैदानी खेळाकडे वळविण्याचा उद्देश -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील शालेय विद्यार्थ्यांना मैदानी खेळाची आवड लागण्यासाठी व मुलींना स्वसंरक्षणासाठी तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी आदी शिवकालीन मर्दानी खेळासह कराटे, तायक्वांदोचे प्रशिक्षण दिले जात आहे. अहमदनगर शोतोकोन कराटे डो असोसिएशनच्या माध्यमातून हा उपक्रम सुरु करण्यात आला असून, याला शालेय मुला-मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
निमगाव वाघाचे ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे व प्रशिक्षक सुरेश जाधव यांच्या पुढाकाराने गावात प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आले आहे. मुलांसाठी सदर प्रशिक्षण वर्ग सुरु केल्याबद्दल डोंगरे व जाधव यांचा बिरोबा देवस्थानचे भगत नामदेव भुसारे यांनी सत्कार केला.

अंगावर आलेल्या व्यक्तीचा हल्ला अचूक पद्धतीने रोखण्याचे आणि कराटे, तायक्वांदो व लाठी काठीच्या माध्यमातून स्वतःचा बचाव करून हल्लेखोरांना सडेतोड उत्तर देण्याचे प्रात्यक्षिक शिकवले जात आहे. प्रशिक्षक सुरेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विविध मर्दानी खेळाचे धडे गिरवत आहे.
सुरेश जाधव म्हणाले की, ग्रामीण भागातील मुले-मुली सक्षम होण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तलवारबाजी, लाठी-काठी, दांडपट्टा या प्राचीन युद्ध कला आहेत. या कला आत्मसात केल्यास आत्मविश्वास वाढतो व शारीरिक व्यायामही होतो. या खेळासाठी एकाग्रता आवश्यक असल्याने मानसिक आरोग्य देखील चांगले राहते. या खेळाला शासनाची देखील मान्यता असल्याने त्याचे परीक्षेतही गुण समाविष्ट केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे म्हणाले की, गावात शिक्षणासह विविध मैदानी खेळांना प्रोत्साहन देऊन खेळाडू घडविण्याचे कार्य सुरु आहे. या प्रशिक्षणातून मुला-मुलींना स्वसंरक्षणाचे धडे मिळणार आहेत. तर शारीरिक व्यायाम होऊन आरोग्य निरोगी राहणार आहे. मोबाईलमध्ये अडकलेल्या पिढीला मैदानी खेळाकडे वळविण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांचे मानसिक, शारीरिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी व त्यांना सदृढ बनविण्याची भावना पालकांमध्ये वाढीस लागली असल्याने मुलांचा ओढा या प्रशिक्षण वर्गाकडे वाढला आहे.