सत्व जागरूक करण्यासाठी इतिहासाची भूमिका महत्त्वाची -नानासाहेब जाधव
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या इतिहासाचा उलगडा करणारे व पुराव्यानिशी मांडलेल्या प्रा. पुष्कर रमेश शास्त्री लिखित निजामशाही आणि अहमदनगर या पुस्तकाचे प्रकाशन अहमदनगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालय व संशोधन केंद्र येथे अखिल भारतीय इतिहास संशोधन योजनेचे राष्ट्रीय सचिव डॉ. बालमुकुंद पांडे यांच्या हस्ते झाले.
इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र व अपरांत प्रकाशन (पुणे) यांच्या वतीने आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळा कृषी शास्त्रज्ञ नानासाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी संघटन मंत्री राधाकृष्ण जोशी, वस्तू संग्रहालयाचे विश्वस्त डॉ. रवींद्र साताळकर, वस्तुसंग्रहालयाचे अभिरक्षक प्रा.डॉ. संतोष यादव, भागवताचार्य रमेश गणेश शास्त्री आदींसह इतिहास प्रेमी व नागरिक उपस्थित होते.
प्रास्ताविकात राधाकृष्ण जोशी यांनी अखिल भारतीय इतिहास संशोधन योजना इतिहासाची माहिती देणार्या पुस्तकांचे प्रकाशन करून त्याचा प्रचार व प्रसार करत आहे. समाजात प्रबोधन करण्याचे काम सुरू असून, पुराव्याशिवाय इतिहास नाही! हे ब्रीदवाक्य घेऊन संघटना कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी महाराष्ट्रातील विद्यापीठ इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष व सदस्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तर कांतीलाल तात्या यांना आदिवासी समाजासाठी केलेल्या निस्वार्थ कार्याबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. बालमुकुंद पांडे म्हणाले की, भारतात एक टक्के देखील मुस्लिम नाही की, जे मुघलांचे वंशज म्हणून पुढे येणार. भारतीय संस्कृतीत इस्लाम फळतफुलत आहे. पूजा करण्याची पद्धत वेगळी असली तरी, विविध धर्म-जातीचे हे सर्व भारतीय आहेत. गुलामगिरीचा इतिहास पुसून भारताचे पुर्ननिर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
लेखक पुष्कर रमेश शास्त्री म्हणाले की, शहराचा इतिहास, भौगोलिक, सांस्कृतिक स्थान मध्यवर्ती राहिले आहे. संत महात्म्यांची भूमी असलेल्या छत्रपतींच्या कुळांचा इतिहास या निजामशाहीची जोडला गेलेला आहे. शहराच्या इतिहासाला चालना मिळून पर्यटनाच्या दृष्टीने शहर पुढे येण्यासाठी पुस्तकाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
कांतीलाल तात्या यांनी आदिवासी समाजाचे स्वत्व जागृत केल्याशिवाय त्यांचा विकास होणार नाही. शासनाच्या कितीही योजना आल्या तरी त्यांचा विकास साधणे अशक्य आहे. इतिहास ज्ञात नाही, त्यांना वर्तमानात देखील स्थान नाही. आदिवासींचा गौरवशाली इतिहास दुर्लक्षित राहिला आह.े ते पुढे आणण्याची गरज असल्याचे सांगितले. डॉ. रवींद्र साताळकर यांनी अहमदनगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालय व संशोधन केंद्र इतिहासाला चालना देण्याचे काम करत आहे. इतिहासाबद्दल लिखाण केलेल्यांचे अनेक पुस्तक प्रकाशन करून, अनेक दुर्मिळ पुस्तकांचे डिजिटलायझेशन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. डॉ. संतोष यादव म्हणाले की, एकमेव अहमदनगर जिल्हा आहे की, त्याला स्थापना दिवस माहित आहे. निजामशाहीचे कर्तृत्व मोठे होते. 1490 साली स्थापन झालेल्या अहमदनगर शहरात मराठी संस्कृती पुढे आणण्याचे काम झाले. भोसले, जाधव घराण्याचे पराक्रम या मातीशी जोडला गेले. ऐतिहासिक संदर्भ देऊन या पुस्तकाची केलेली मांडणी अभ्यासासाठी दिशादर्शक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नानासाहेब जाधव म्हणाले की, जिल्ह्याचा प्रेरणा देणारा इतिहास आहे. पाचशेवर्षा पूर्वीचा इतिहास समोर असताना शहर स्थापनापूर्वीचा इतिहास देखील समोर येण्याची गरज आहे. हे मोठे आव्हान इतिहास संशोधकांसमोर असल्याचे त्यांनी सांगितले. सत्व जागरूक करण्यासाठी इतिहासाची भूमिका महत्त्वाची ठरते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शामा जाधवर गीते यांनी केले. आभार डॉ. रवी सातभाई यांनी मानले.