प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाडे मोडण्याची वेळ
राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट
अहमदनगर (प्रतिनिधी)- पावसाचे कारण थांबवून, नवरात्र उत्सवापूर्वी दिवाळी-दसर्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने करण्यात आली. शहरातील खड्डे प्रश्नी महापालिका आयुक्त पंकज जावळे यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, महिला विभागाच्या रेश्माताई आठरे, उद्योग व व्यापार सेलचे अनंत गारदे, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, ओबीसी सेलचे अमित खामकर, युवक शहराध्यक्ष केतन क्षीरसागर, जॉय लोखंडे, डॉ. रणजित सत्रे, साधना बोरुडे, सुजाता दिवटे, केडगाव विभागाचे भरत गारुडकर, सुनीता गुगळे, शाहरुख शेख, शाहनवाज शेख, वसिम शेख, जाकिर तांबोळी, फिरोज पठाण आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अहमदनगर शहरातील सर्वच रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली असून, शहरातील खड्डेमय रस्त्यांची परिस्थिती सुधारली जात नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाचे कारण दाखवून खड्ड्यांची दुरुस्ती केली जात नसल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाडे मोडण्याची वेळ आली आहे. पाठ दुखी, कंबरदुखीने अनेक नागरिक त्रस्त आहेत. तर गर्भवती महिलांना रस्त्यावर येणे देखील कठीण झाले असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

खड्डेमय रस्त्यांमुळे वाहतुक कोंडीचा त्रासही जनतेला सहन करावा लागत आहे. महिला व विद्यार्थ्यांना रस्त्यावर जाताना मोठ्या हालअपेष्टा सोसाव्या लागत आहे. लवकरच नवरात्र उत्सव सुरू होणार असून, दिवाळी, दसरा सण देखील जवळ आला आहे. नागरिक विशेषत: महिला वर्ग नवरात्र निमित्त धार्मिक व इतर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडत असतात. अशा वेळेस रस्त्यावर असलेल्या खड्डयांमुळे अनेक लहान-मोठे अपघात घडण्याची शक्यता असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
मोहरम व गणेशोत्सव काळात करण्यात आलेली रस्त्यांची तात्पुरती मलमपट्टी पावसाने वाहून गेली आहे. अत्यंत दयनीय अवस्था नगरच्या रस्त्यांची झाली आहे. महापालिका प्रशासनाने रस्त्याची त्वरित पाहणी करून रस्ता दुरुस्तीचे काम त्वरित मार्गी लावावे. काही रस्त्याचे काम अर्धवट सोडून देण्यात आले असून, ते देखील पूर्ण करण्याची मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. शहरातील रस्त्यांच्या कामाची पहाणी करुन सदरचे काम मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
