निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन
भिडे महाराष्ट्राचा मणिपूर करण्याच्या मनस्थितीत -मोसिम शेख
अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजात द्वेष पसरविण्याच्या उद्देशाने बेताल वक्तव्य करणाऱ्या शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यावर राज्य शासनाने त्वरित कायदेशीर कारवाई करण्याची मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना देण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोसिम शेख, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भंडारी, खलील शेख, श्यामराव वाघस्कर, रिजवान शेख, युवक काँग्रेसचे सरचिटणीस सागर इरमल, भिंगार ब्लॉक अध्यक्ष भूषण चव्हाण, फिरोज शेख, प्रवीण गीते, इक्बाल पठाण, इमरान बागवान, निसार बागवान, अमित लोखंडे, आकाश लोखंडे, योगेश काळे, सागर शिंदे, अज्जू शेख, अस्लम शेख, अकदस शेख, शहेबाज बेग, शरीफ सय्यद आदी उपस्थित होते.
शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी मागील आठवड्यात काही कारण नसताना आपल्या देशातील महापुरुष महात्मा गांधी, महात्मा फुले व भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी अत्यंत निंदनीय प्रकारचे वक्तव्य केले. तसेच सर्व धर्मियांचे व देश-विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री साईबाबाबद्दल अत्यंत नास्तिक पद्धतीची भाषा वापरून बेताल वक्तव्य केले आहे. त्यांचे वक्तव्य संपूर्ण समाजाला काळीमा फासणारे आहे. महिलांबद्दल देखील त्यांना आदर नाही. अनेकदा बेताल वक्तव्य करुन ते समाजात अशांतता पसरविण्याचे काम करत असल्याचे युवक काँग्रेसच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
भिडे यांच्या वक्तव्याने समाजात द्वेष पसरत असून, त्यांना मोकळीक मिळत असल्याने बेछुटपणे वादग्रस्त विधान करण्यात येत आहे. भिडे गुरुजी हे महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा मनस्थितीत असल्याची भावना युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोसिम शेख यांनी व्यक्त केली. तर भिडे यांच्यावर त्वरीत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.