प्रहार दिव्यांग संघटनेच्या पाठपुराव्याला यश
आयुक्तांनी सहानुभूतीपूर्वक दिव्यांगास सेवेत हजर करुन घेण्याचे दिले आदेश
अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रहार दिव्यांग संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन एका दिव्यांग महिलेला महापालिकेच्या आरोग्य सेवेत दाखल करुन घेण्यात आले. महापालिकेच्या सेवेत दाखल झालेल्या दिव्यांग महिलेचे मनपा आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांनी स्वागत केले. यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. लक्ष्मण पोकळे, राजेंद्र पोकळे, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे, नगरसेवक गणेश नन्नवरे, गीतांजली कासार, संदेश रपारिया आदी उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र आरक्षित कोटा असतो. याप्रमाणे शहरातील दिव्यांग बांधवांचा महापालिकेच्या सेवेत समावेश करण्याची मागणी प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याकडे करण्यात आली होती. आयुक्त जावळे यांनी या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन दिव्यांग महिलेस महापालिकेच्या सेवेत हजर करुन घेण्याचे आदेश दिले. या आदेशावरुन सरला मोहोळकर या दिव्यांग महिलेला हजर करुन घेण्यात आले असल्याची माहिती अॅड. लक्ष्मण पोकळे यांनी दिली.