दरेवाडी गटातून तरुण नेतृत्वासाठी कार्यकर्त्यांची मागणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- टाकळी काझी ग्रामपंचायतीचे उपसरपंच हर्षल कांबळे यांनी दरेवाडी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. अलीकडेच पार पडलेल्या समर्थकांच्या बैठकीत कांबळे यांच्या नावाची उमेदवारीसाठी एकमुखी मागणी कायकर्त्यांनी केली. या बैठकीत गावातील अनेक युवा कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीदरम्यान हर्षल कांबळे यांनी आगामी निवडणुकीसाठी तयारी दर्शवली असून, जनतेच्या सेवेसाठी आपल्या ताकदीने योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला. उपसरपंच म्हणून हर्षल कांबळे यांनी टाकळी काझी गावात अनेक विकासात्मक कामे पार पाडली आहेत. विकासात्मक कामातून त्यांनी स्थानिकांमध्ये विशेष विश्वास निर्माण केला आहे.
हर्षल कांबळे हे कै. आमदार शिवाजी कर्डीले यांचे विश्वासू कार्यकर्ते असून, सध्या पै. अक्षय कर्डीले यांचे खंदे समर्थक मानले जातात. कर्डीले परिवाराशी असलेल्या घट्ट नात्यामुळे आणि पक्षनिष्ठ कार्यशैलीमुळे त्यांचा प्रभाव केवळ टाकळी काझीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण दरेवाडी गटात वाढला आहे. तरुण कार्यकर्त्यांशी असलेला त्यांचा संवाद, संघटनात्मक कौशल्य आणि लोकाभिमुख दृष्टिकोन यामुळे त्यांच्या उमेदवारीला स्थानिक स्तरावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.
बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी दरेवाडी गटात परिवर्तनासाठी तरुण नेतृत्वाची गरज आहे, असे मत मांडले. या पार्श्वभूमीवर हर्षल कांबळे यांचे नाव पुढे आले असून, त्यांनी या आव्हानासाठी तयारी दर्शवली आहे. गावातील व वरिष्ठ कार्यकर्त्यांचा विश्वास आहे की, हर्षल कांबळे हे तरुण असून, त्यांनी ग्रामविकासाबरोबरच धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही सातत्याने योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली दरेवाडी गटात विकासाचा नवा अध्याय सुरू होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. हर्षल कांबळे यांच्या उमेदवारीमुळे दरेवाडी गटातील निवडणुकीची रंगत वाढणार आहे.
