• Fri. Mar 14th, 2025

डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा गौरव

ByMirror

Mar 11, 2023

सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व रोख रक्कम देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार

स्पर्धामय जीवनात प्रत्येक पावलांवर परीक्षा -डॉ. राजेंद्र कलाल

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील प.पू. डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थांना बक्षिस देऊन सन्मान करण्यात आले. शिक्षणशास्त्र प्रतिष्ठानचे कार्यवाह प्रा. सोमनाथ दिघे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ.रावसाहेब पवार, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. राजेंद्र कलाल, प्रा.डॉ.रविंद्र चोभे आदी उपस्थित होते.


दरवर्षी ही प्रज्ञाशोध परिक्षा घेतली जात असून, या परीक्षेचे हे 32 वे वर्ष होते. 22 जानेवारी रोजी जिल्हाभर ही परीक्षा विविध केंद्रात घेण्यात आली. यामध्ये 2200 विद्यार्थी बसले होते. इयत्ता चौथी व सातवी मधील मराठी व इंग्रजी माध्यमाचे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाचे विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व रोख रक्कम बक्षिस म्हणून उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले.


डॉ. राजेंद्र कलाल म्हणाले की, स्पर्धामय जीवनात प्रत्येक पावलांवर परीक्षा सुरु असते. परिस्थितीचा सामना करुन प्रत्येक परीक्षेत प्रयत्नपूर्वक उत्तीर्ण व्हावे लागते. यासाठी गुरुजनांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात प्रा.डॉ. रविंद्र चोभे यांनी विद्यार्थ्यांची प्रज्ञा वाढविण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येत असल्याचे सांगितले.


कार्यक्रमासाठी संस्थेचे कोषाध्यक्ष अरुणराव धर्माधिकारी, संस्थेचे अध्यक्ष दादाराम ढवाण, विश्‍वस्त श्री व सौ. वैद्य, दत्ताजी जगताप, प्रा. डॉ. पारधे मॅडम, प्रा.डॉ. कुमावत, प्रा.दादासाहेब काजळे, मुख्याध्यापक संदिप भोर आदींसह शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रज्ञाशोध परीक्षाचे अहवाल वाचन प्रा.डॉ.कुमावत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गितांजली खाडे व प्रगती मिसाळ यांनी केले. आभार प्रा.डॉ. भांडारकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *