गुन्हेगारीचा कर्दनकाळ म्हणून अल्पकाळात प्रकाश झोतात
अहमदनगर (प्रतिनिधी)- गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून अतिशय अल्पकाळात प्रकाश झोतात आलेले राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे गुन्हेगारीचा कर्दनकाळ ठरत आहे. त्यांची सिंघम स्टाईल कार्यपद्धतीची जिल्ह्यात जोरदार चर्चा होत आहे. मुंबईच्या क्राईम ब्रँचचा असलेला दांडगा अनुभव, गुन्हेगारी क्षेत्रावर लगाम लावण्यास प्रभावी ठरत आहे.
राहुरी पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखले जाते. राजकीय दिग्गजांचा तालुका असलेल्या राहुरी परिसराचा साखर कारखानदारी, सहकार, शैक्षणिक संस्था, रेल्वेमुळे झपाट्याने विकास झाल्याचे दिसून येत असले तरी, काही गडबड झाल्यास तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेपुढे आव्हान उभे राहण्यास वेळ लागत नाही. चांगल्यापैकी आर्थिक संपन्नता असल्याने अवैध धंदे व त्यानुषंगाने फोफावलेली गुन्हेगारीही दखलपात्रच ठरते. वाळू, गौण खनिज तस्करी, खाजगी अवैध सावकारी हे या तालुक्यातील कळीचे मुद्दे आहेत.
त्यासाठी राहुरी पोलीस ठाण्याचा कारभार स्विकारणारा अधिकारी खमक्या असावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. जो अधिकारी राहुरी पोलीस ठाण्याचा कारभार हाती घेतो त्याला कायदा-सुव्यवस्था राखण्याबरोबरच राजकीय पातळीवरही समतोल ठेवण्याचे आव्हान पेलावे लागते. त्यातून त्यांना प्रसंगी आरोप प्रत्यारोपांना तोंड द्यावे लागून पुढार्यांच्या मिन्नतवार्या करण्यात बराचसा वेळ खर्ची घालावा लागत असल्याचे दिसून आले आहे.
मात्र काही महिन्यांपूर्वी हजर झालेले पोलीस निरीक्षक प्रताप दराडे याला अपवाद ठरल्याचे दिसून आले आहे. राहुरी परिसरातील गुन्हेगारीवर जरब बसवून त्यावर चांगल्यापैकी नियंत्रण ठेवण्यात दराडे अल्प कालावधीत यशस्वी झाल्याची चर्चा तालुक्यात झडताना दिसते. त्यांच्या पूर्वी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये सामान्य नागरिक येण्यास धजत नव्हते. परंतु प्रताप दराडे हे या ठिकाणी हजर झाल्यापासून राहुरी पोलीस ठाण्यात सामान्य नागरिक आपल्या समस्या घेऊन येत आहेत. तसेच आलेल्या समस्यांचे त्यांचं समाधान करून निराकरण करण्यास प्रताप दराडे हे यशस्वी होताना दिसत आहेत.
तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांनी तर त्यांना चक्क बाजीराव सिंघम म्हणून संबोधण्यास सुरुवात केलेली आहे. आलेल्या नागरिकांचे प्रश्न सोडवून तात्काळ त्यावर योग्य कारवाई करून त्यांचे समाधान करण्यामध्ये ते यशस्वी ठरत आहे. गुन्हेगारांमध्ये देखील पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचा चांगलाच वचक बसला असून त्यांच्यात दहशत निर्माण झाली आहे.