स्नेहालयाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. गिरीश कुलकर्णी यांचा मार्कंडेय शाळेत सन्मान
स्नेहालयात शोषित व वंचित घटकातील मुलांना शिक्षणाने दिशा देण्याचे कार्य प्रेरणादायी -बाळकृष्ण सिद्दम
अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक दर्जाच्या टी फॉर एज्युकेशन या संशोधन संस्थेने स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलची जगातील सर्वोत्तम दहा शाळांच्या पुरस्कार यादीत निवड केल्याबद्दल पद्मशाली विद्या प्रसारक मंडळ व गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय विद्यालयाच्या वतीने स्नेहालयाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. गिरीश कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला.
मार्कंडेय शाळेत झालेल्या सन्मान सोहळ्याप्रसंगी पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम, संस्थेचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ संचालक शरद क्यादर, उपाध्यक्ष विलास पेद्राम, खजिनदार जयंत रंगा, विश्वस्त राजेंद्र म्याना, विद्यालयाचे मुख्याध्यापक संदिप छिंदम, पर्यवेक्षक प्रमोद चन्ना, ग्रंथपाल विष्णू रंगा आदी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम म्हणाले की, स्नेहालयाने नेहमीच समाजातील वंचित, दुर्बल व शोषित घटकांना आधार देण्याचे कार्य केले. याच बरोबर वंचित घटकातील विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षण देण्यासाठी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलची उभारणी केली. ही शाळा शोषित व वंचित घटकातील मुलांना शिक्षणाने दिशा देण्याचे प्रेरणादायी कार्य करत आहे. शाळेला मिळालेला पुरस्कार ही त्यांच्या कार्याची पावती आहे. यामध्ये डॉ. गिरीश कुलकर्णी यांचा महत्त्वाचा वाटा असून, स्नेहालय संस्थेचे नाव जागतिक पातळीवर प्रकाशमान झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना डॉ. गिरीश कुलकर्णी म्हणाले की, वंचित घटकातील मुलांचा विचार करुन स्नेहालय इंग्लिश मिडियम स्कूलची स्थापना करण्यात आली. आज या शाळेला जगातील सर्वोत्तम शाळा पुरस्कार मिळाला, ही नगरकरांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. प्रतिकूलता आणि असमानता यावर मात करीत या शाळेत मुले शिक्षण घेत आहे. शाळेतील शोषित महिलांचे मुले, एच.आय.व्ही.सह जीवन जगणारी मुले, लालबत्ती भागातील मुले यांना मुख्य प्रवाहातील विद्यार्थी सोबत एकत्र आणून त्यांच्याबद्दलची समाजातील असमानता दूर करण्याचा प्रयत्न शिक्षणाच्या माध्यमातून सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. तर कुटुंबाच्या वतीने झालेला सत्कार नेहमीच पाठबळ देणारा व कायम स्मरणात राहणार असल्याचे त्यांनी विशद केले.
शरद क्यादर यांनी स्नेहालय संस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत पद्मशाली विद्या प्रसारक मंडळ व श्री मार्कंडेय विद्यालयाचे नेहमीच सहकार्य राहिले आहे. आपल्या माणसाने घेतलेल्या भरारीचे व यशाचे अभिमान वाटत असल्याचे सांगितले.