पाणी बचत, पाण्याचे योग्य नियोजन, जलसंधारणाची कामाची जागृती
पाण्याचे नियोजन करुन भविष्यातील संकटे टाळता येणार -प्रा. राजेंद्र गवई
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद जल जीवन मिशन कक्षच्या वतीने केडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दोन दिवसीय ग्रामस्तरीय क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यशाळेचा नुकताच समारोप झाला. या कार्यशाळेस सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका व मदनीस यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये पाणी बचत, पाण्याचे योग्य नियोजन, जलसंधारणाची कामे याबाबत जागृती करुन केंद्र सरकारची हर घर नळ योजना सिध्दीस नेण्याचा संकल्प करण्यात आला.
या कार्यशाळेत सहभागी झालेल्यांना बुलढाणा येथील प्रशिक्षक प्रा. राजेंद्र गवई यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, नितीन नेमाने, ग्रामसेवक श्रीपत फलके, सुलभा जाधव, अनिता झरेकर, भाऊसाहेब बोरुडे, ग्रामसेवक शेख आदी उपस्थित होते.
प्रा. राजेंद्र गवई म्हणाले की, हर घर नळ योजनेच्या माध्यमातून सर्वांना मुबलक व शुध्द पाणी उपलब्ध करुन देण्याचा सरकारचा निर्णय आहे. याद्वारे ग्रामस्थांना मिटरद्वारे पाणी मिळणार असून, आवश्यकतेनूसार पाणी उपलब्ध झाल्याने त्याची उधळपट्टी होणार नाही. पाण्याचे नियोजन करुन भविष्यातील संकटे टाळता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, पाणी बचत व त्याचे योग्य नियोजन हे देखील सामाजिक कार्य बनले आहे. पिण्यासाठी योग्य पाणी नसल्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. तर शुध्द पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहे. केंद्र सरकारने घेतलेली हर घर नळ योजना ग्रामीण भागाच्या विकासात्मक वाटचालीस प्रेरणा देणारी असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेने पाण्याचे महत्त्व लक्षात येवून भविष्यात त्याच्या नियोजनाबाबत काम करण्याची दिशा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.