राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्थेचा (निसबड) उपक्रम
उद्योग-व्यवसायात डिजिटल मार्केटिंग काळाची गरज -दिव्या अग्रवाल
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील जन शिक्षण संस्थेत राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था (निसबड) आयोजित जन शिक्षण संस्थेत पाच दिवसीय उद्योजकता विकास कार्यशाळेचे उद्घाटन पार पडले. या कार्यशाळेला जिल्ह्यातील महिला व युवतींचा प्रतिसाद लाभला. यावेळी जनशिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार, नोएडा येथील निसबड संस्थेच्या दिव्या अग्रवाल, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी तात्यासाहेब जीवडे, उद्योजक जितेंद्र तोरणे, कार्यक्रम सल्लागार समिती सदस्य कमल पवार, प्रशिक्षिका पुष्पा निगळे, कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कुंदा शिंदे, लेखापाल अनिल तांदळे आदींसह प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.
प्रारंभी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन झाले. प्रास्ताविकात बाळासाहेब पवार म्हणाले की, संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात 35 हजार महिला, युवती व युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम करण्यात येत आहे. ग्रामीण भागात देखील गावी-गावी जावून प्रशिक्षणाची व्यवस्था करून देण्यात आली आहे. तर विविध व्यावसायिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून कौशल्य निर्माण करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दिव्या अग्रवाल म्हणाल्या की, शासनाने महिला उद्योजक व व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अनेक कल्याणकारी योजना हाती घेतल्या आहेत. त्या योजनांचा फायदा घेण्याची गरज आहे. उद्योग-व्यवसायात मार्केटिंग सर्वात महत्त्वाची आहे. उत्पादन दर्जेदार असले तरी, मार्केटिंगशिवाय पर्याय नाही. डिजिटल मार्केटिंग काळाची गरज बनली असून, या प्रशिक्षणाद्वारे महिलांना मार्केटिंग व व्यवसाय कसा उभा करावा, भांडवल कसे उपलब्ध करावे याबद्दल मार्गदर्शन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्योजक जितेंद्र तोरणे म्हणाले की, महिलांनी व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन व्यवसाय व उद्योगधंद्यात उतरावे. आर्थिक सक्षम झालेल्या महिलांच्या कुटुंबाचा विकास झपाट्याने साधला जातो. ग्रामीण भागात महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध करून त्यांना आर्थिक संपन्न करण्याचे जन शिक्षण संस्थेचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
तात्यासाहेब जीवडे म्हणाले की, व्यवसायात उतरण्यासाठी प्रशिक्षणाची गरज पडते. प्रशिक्षणाने मनुष्यात कौशल्य निर्माण होतात. तर त्यांच्या नवनवीन कल्पनांना चालना मिळते. व्यवसाय, उद्योगधंद्यात स्पर्धा न करता समाजाची गरज पूर्ण करण्याचे काम केल्यास उद्योग व्यवसायात यश मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातून 31 महिलांची निवड करण्यात आली आहे. हे प्रशिक्षण 14 जुलै पर्यंत चालणार असून, यामध्ये महिलांना व्यवसाय व उद्योग उभे करण्यासह त्याचे ब्रॅण्डिंग, मार्केटिंगची माहिती दिली जाणार आहे.
