माहेश्वरी सावेडी बहु मंडळाचा उपक्रम
सतनाम साक्षी गोशाळेला एक टन चारा व एक टन मक्याचे वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी)- माहेश्वरी सावेडी बहु मंडळाच्या वतीने अधिक मास निमित्त गो मातेचे पूजन करुन छप्पन भोग दाखविण्यात आले. सावेडी, बारस्कर मळा येथील सतनाम साक्षी गोशाळेत झालेल्या गोमातेचा छप्पन भोग कार्यक्रमात बहु मंडळाच्या महिलांनी गोशाळेला एक टन चारा व एक टन मक्याचे वाटप केले.

गोमातेच्या छप्पन भोग कार्यक्रमात महिलांचा भजनाचा कार्यक्रम रंगला होता. महिलांनी सादर केलेल्या विविध भजनांनी वातावरण प्रसन्न बनले होते. गोमातेची आरती करुन भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा कविता काकाणी, उपाध्यक्ष नूतन मालाणी, सचिव गायत्री पल्लोड, खजिनदार सुखदा माहेश्वरी, अर्चना बुब, स्वाती काकाणी, संगीता सिकची, नेहा पल्लोड, वैष्णवी बजाज, वैशाली मालपाणी, कविता भंडारी, पौर्णिमा तापडिया आदींसह माहेश्वरी सावेडी बहु मंडळाच्या महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अध्यक्षा कविता काकाणी म्हणाल्या की, माहेश्वरी सावेडी बहु मंडळाच्या वतीने महिला एकत्र येऊन सामाजिक योगदान देत आहे. संस्कार टिकवणे व रुजविण्याचे कार्य महिला करत असून, या उद्देशाने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक चळवळीत योगदान देण्यासाठी महिलांचा सातत्याने पुढाकार राहिला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी गोशाळेत कार्यरत बांधवांना वस्त्राची भेट देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व महिला सदस्यांनी परिश्रम घेतले.