लाल निशाण पक्षाची मागणी
अन्यथा 7 ऑगस्ट पासून मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसह महाबीज प्रक्रिया केंद्राच्या कार्यालया समोर उपोषण
अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनाच्या महाबीज प्रक्रिया केंद्र खंडाळा (ता. श्रीरामपूर) येथे कोरोना काळात काम करीत असताना कोरोनाची लागण होऊन मयत झालेल्या कामगारांच्या वारसांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई व अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घेण्याची मागणी लाल निशाण पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन संघटनेचे कॉ. अनंत लोखंडे, कॉ. पंकज लोखंडे, राजू वैराळ, कॉ. विनायक गोरखे यांनी महाबीज प्रक्रिया केंद्राच्या जिल्हा व्यवस्थापकांना दिले आहे. याबाबत कार्यवाही न झाल्यास 7 ऑगस्ट पासून मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसह महाबीज प्रक्रिया केंद्राच्या कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महाबीज प्रक्रिया केंद्र खंडाळा (ता. श्रीरामपूर) येथे कोरोना काळात काम करीत असताना आप्पासाहेब संभाजी पवार, भरत बाजीराव जाधव, आशाबाई भीमराज आजबे हे कर्मचारी कोरोनाने बाधित होऊन त्यांचा उपचारादरम्यान निधन झाले. संबंधितांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील वारसांना महाबीज कडून 50 लाख रुपये नुकसान भरपाई व अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घेण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आलेला आहे. मात्र अद्यापही कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारे सदर मागण्यांची पूर्तता करण्यात आलेली नाही. घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने सदर कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी आदेश देऊनही महाबीज प्रक्रिया केंद्राने मयत व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत मिळण्यासाठी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. तातडीने सदर मागणी पूर्ण न झाल्यास मयत व्यक्तींच्या कुटुंबीयांसह संघटनेच्या वतीने उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.