शालेय विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
व्याख्यान, मनोरंजनात्मक खेळ, विविध स्पर्धेत रंगल्या मुली
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुलच्या इयत्ता 10 वी मध्ये शिकत असलेल्या मुलींचे शहरातील निशा लॉन येथे मुलीपण भारी देवा या एकदिवसीय मुक्कामी नाईट कॅम्प उत्साहात पार पडले. लेक वाचवा, लेक शिकवा! या संकल्पनेने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नुकताच प्रदर्शित झालेला बाईपण भारी देवा हा चित्रपटाला महिला वर्गाचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या धर्तीवर मुलीपण भारी देवा असे शीर्षक असलेल्या आगळ्या वेगळे कॅम्पचे आयोजन ज्ञानसाधना गुरुकुलचे संचालक प्रा. प्रसाद जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. भविष्यातील वाटचालीत मुलींना प्रेरणा मिळण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये व्याख्यान, मनोरंजनात्मक खेळ, विविध स्पर्धा रंगल्या होत्या. तर मुलींनी एकत्रित स्नेहभोजानाचा आस्वाद घेतला.

या उपक्रमाची माहिती देताना प्रा. प्रसाद जमदाडे म्हणाले की, कॅम्प घेण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे, गावाकडील मुली जेव्हा बाहेरगावी शिक्षणासाठी जातील त्यानंतर त्यांना कोणकोणत्या चांगल्या वाईट प्रसंगाना सामोरे जावे लागेल. विविध खेळ खेळत असतानाच स्वतः स्वयंपाक करणे, सर्व गोष्टी स्वतःच्या स्वतः करणे, समोर आलेल्या छोट्या-मोठ्या संकटांना कसे धैर्याने सामोरे जावे लागते हा अनुभव मुलींना या कॅम्पद्वारे आला. येणाऱ्या काळात अडचणीवर मात करण्याची कला शिकवणारा हा कॅम्प मुलींसाठी प्रेरणा देणारा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कॅम्पसाठी निशा उद्योग समूहाचे जालिंदर कोतकर यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. कॅम्प यशस्वी करण्यासाठी लंडन किड्स शाळेच्या प्रिन्सिपल रुचिता जमदाडे, शबाना शेख, एकता कुकडिया, सुवर्णा दाणी या शिक्षकांनी परिश्रम घेतले.