पुण्यतिथीच्या एकदिवसीय कीर्तन सोहळ्यात भाविक मंत्रमुग्ध
मंदिरातून समाजाला आत्मिक बळ व प्रेरणा मिळते -सचिन कोतकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक व धार्मिक कार्यात प्रत्येकाचा हातभार गरजेचा आहे. कोण किती देतो? हे पाहण्यापेक्षा आपल्या क्षमतेनुसार प्रत्येकाने योगदान देण्याची गरज आहे. मंदिरातून समाजाला आत्मिक बळ व प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन उद्योजक सचिन कोतकर यांनी केले.

केडगाव, उदयनराजेनगर परिसरात श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज मंदिराच्या कामाचे भूमीपूजन व पुण्यतिथीनिमित्त एकदिवसीय कीर्तन सोहळ्याप्रसंगी कोतकर बोलत होते. यावेळी नगरसेवक गणेश ननावरे, उद्योजक जालिंदर कोतकर, सचिन सातपुते, राजू सातपुते, संतोष लोंढे, देवा होले, संजय गारुडकर, रुपेश गुगळे, ह.भ.प. सानप ताई, माजी नगरसेवक अशोक कराळे, मच्छिंद्र भांबरे, राजेंद्र पडोळे, गव्हाणे महाराज, गणेश सातपुते, पोपट कराळे, विनोद पुंड, बाळासाहेब भुजबळ, मनोज गाडळकर, निलेश चिपाडे, ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर, ह.भ.प. रामदास शेंडे महाराज आदी उपस्थित होते.
पुढे कोतकर म्हणाले की, मंदिर उभारण्याबरोबर त्याची उपासना व जोपासनेत सातत्य ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. मंदिर उभारताना कोतकर परिवाराचे सर्व परीने योगदान राहणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.
प्रास्ताविकात विश्वेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते म्हणाले की, मंदिरातून भावी पिढीला संस्कार व दिशा देण्याचे कार्य होणार आहे. या धार्मिक व समाजकार्यासाठी सचिन कोतकर यांच्या मोठे सहयोग लाभले. माजी महापौर संदीप कोतकर व ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे काम होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गणेश ननावरे म्हणाले की, उदयनराजे नगरचे वैभव म्हणून हे मंदिर उदयास येणार आहे. या मंदिराने परिसराच्या वैभवात भर पडणार असून, एक धार्मिक व प्रसन्न वातावरण निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ह.भ.प. भागवताचार्य पूजाताई आळकुटे यांच्या कीर्तनाच्या भक्तीरसात भाविक नाहून निघाले. यावेळी केडगाव परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज पुण्यतिथीनिमित्त परिसरातून मिरवणूक काढण्यात आली होती. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वेश्वर प्रतिष्ठान, विश्वेश्वर क्रिकेट क्लब, स्पार्टन प्रतिष्ठान, वैष्णव नगर मित्र मंडळ व समस्त भजनी मंडळाचे सहकार्य लाभले.