महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी
संच मान्यतेसाठी आधारची सक्ती करू नये -बाबासाहेब बोडखे
संच मान्यतेसाठी आधारची सक्ती करू नये -बाबासाहेब बोडखे
अहमदनगर (प्रतिनिधी)- आधार स्टुडन्ट व्हॅलिड-इनव्हॅलिड करण्यासाठी मुदत वाढवून मिळण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांना शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष प्रा. सुनील पंडित, कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, सरकार्यकार्य राजकुमार बोनकिले, मुंबई विभाग कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी पाठविले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

स्टुडन्ट पोर्टल नुसार संच मान्यता करण्याचे कार्यवाही सद्यस्थितीत कार्यान्वित करण्यात आली आहे. यासाठी मोठ्या तांत्रिक अडचणींचा सामना शिक्षकांना करावा लागत आहे. पोर्टलची वेबसाईट वारंवार बंद पडत असल्याने माहिती भरणे शक्य होत नाही. विद्यार्थ्यांची वारंवार माहिती अपडेट करूनही एकूण संख्येत तफावत दिसून येते. विद्यार्थी अपडेट करण्यासाठी स्टुडंट्स पोर्टलची साईट अतिशय धिम्या गतीने सुरु असल्याने जास्त वेळ लागत आहे. इयत्ता दहावी, बारावीचे विद्यार्थी बोर्ड परीक्षा देऊन घरी गेल्यामुळे ते लवकर संपर्कात येत नाही, त्यामुळे अपडेट करायला प्रतिसाद देत नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
शाळेच्या पटावर नोंद असलेले, परंतु सरल प्रणालीमध्ये आधार क्रमांक नसलेल्या विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अपडेट झाल्यानंतर नोंद झालेले विद्यार्थी संच मान्यतेसाठी ग्राह्य धरण्यात यावे, नाव, लिंग, किंवा जन्मतारीख जुळत नसलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत असे विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेमध्ये उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित शाळेच्या संच मान्यता करिता ग्राह्य धरण्यात यावे, ज्या विद्यार्थ्यांनी आधार क्रमांकसाठी नोंदणी केली आहे, परंतु अद्याप पर्यंत आधार क्रमांक मिळालेला नाही असे विद्यार्थी संबंधित शाळेत नियमित येत असून, हे विद्यार्थी संच मान्यतेसाठी ग्राह्य धरण्यात यावे व संच मान्यतेसाठी आधारची सक्ती करू नये तसेच स्टुडन्ट व्हॅलिड-इनव्हॅलिड करण्यासाठी 30 जून पर्यंत मुदत वाढवून देण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली असल्याचे बोडखे यांनी म्हंटले आहे.