• Fri. May 1st, 2026

अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणास राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा विरोध

ByMirror

Apr 30, 2026

जिल्हाधिकाऱ्यांना महासंघाच्या वतीने निवेदन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरण करण्याच्या निर्णयाला राष्ट्रीय चर्मकार महासंघाने विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात महासंघाच्या अहिल्यानगर जिल्हा शाखेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांना सदर मागणीचे निवेदन देण्यात आले.


सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत दिलेल्या निकालामुळे समाजात फूट पडण्याची शक्यता असून, यामुळे मूळ आरक्षणाच्या उद्देशाला बाधा पोहोचू शकते, अशी भीती महासंघाने व्यक्त केली आहे. “आरक्षण हे सामाजिक विषमतेवर आधारित आहे, त्यामुळे त्याचे वर्गीकरण करणे अन्यायकारक ठरेल,” अशी भूमिका यावेळी पदाधिकाऱ्यांनी मांडली.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय नेते माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या आदेशाने आणि प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव साळवे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदारे, राज्य सदस्य कैलास गांगर्डे, सुभाष झरेकर, संतोष त्रिंबके, सुशील साळवे, बाबासाहेब सोनवणे, प्रभाकर गांगर्डे, ज्ञानेश्‍वर म्हैसमाळे, गणेश गोरे यांच्यासह महासंघाचे अन्य प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अनुसूचित जातीमध्ये पोटजातीनुसार उपवर्गीकरण करू नये, अनुसूचित जातीच्या ऐक्याला तडा जाईल असे कोणतेही पाऊल सरकारने उचलू नये, चर्मकार समाजासह संपूर्ण अनुसूचित जातीच्या हक्कांचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारने योग्य ती भूमिका घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *