सामाजिक कार्यकर्ते सतीश सायंबर जिल्हा क्रीडा अधिकारी यांना निवेदन
अधिकची पैसे वसुली, दरपत्रकावर काळे रंग, अरेरावीची भाषा; प्रशासनाकडे चौकशीची मागणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील वाडियापार्क येथील जलतरण तलावात ठेकेदाराकडून नियमांची पायमल्ली करत नागरिकांकडून जादा शुल्क आकारले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सतीश सायंबर यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांना निवेदन देऊन संबंधित ठेकेदाराविरोधात तत्काळ चौकशी व कारवाई करण्याची मागणी केली आहे.
क्रीडा संकुल समितीकडून जलतरण तलावाचा ठेका देताना ठेकेदाराला स्पष्ट अटी व शर्तींनुसार नियम पाळण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, ठेकेदाराने या सर्व नियमांना “केराची टोपली” दाखवत स्वतःचेच नियम बनवून मनमानी कारभार सुरू केला असल्याचे आरोप निवेदनात करण्यात आले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते सायंबर यांच्या म्हणण्यानुसार, ठेकेदाराने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा प्रत्येक नागरिकाकडून 10 ते 20 रुपये अधिक आकारले जात आहेत. या छोट्या रकमेचा दिवसभरातील आणि महिनाभरातील आकडा लाखो रुपयांपर्यंत पोहोचतो, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, जलतरण तलावाच्या कार्यालयात लावण्यात आलेल्या दरपत्रकावर काळ्या रंगाने दर खोडून टाकण्यात आले आहेत, ज्यामुळे नेमके अधिकृत दर कोणते हे नागरिकांना कळत नाही. जेव्हा पोहण्यासाठी येणारे नागरिक किंवा पालक दराबद्दल कर्मचाऱ्यांकडे विचारणा करतात, तेव्हा अरेरावीच्या भाषेत उत्तर दिले जाते, असा आरोप सायंबर यांनी केला आहे.
“अधिकचे 10-20 रुपये जरी दिसायला किरकोळ वाटले तरी दररोज व महिनाभरात या रकमेचे लाखों रुपयांपर्यंत उत्पन्न ठेकेदाराकडे जात आहे. हे थेट जनतेच्या पैशाची लूट आहे. प्रशासनाने यासंदर्भात तातडीने कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा सतीश सायंबर यांनी दिला आहे.
