व्यापारी, उद्योजक यांची आर्थिक फसवणुक होत असल्याचा आरोप
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा मंचची तक्रार
अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी, नवनागपूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीची कुठलीही परवानगी न घेता, कोणत्याही संस्थेची नोंदणी नसताना बनावट पावत्या छापून वर्गणीच्या नावाखाली व्यापारी, उद्योजक यांची आर्थिक फसवणुक करणाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करावे व वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पध्दतीने विनापरवाना रस्त्यावर मांडव टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष अंतोन गायकवाड यांनी केली आहे. या मागणीचे निवेदनाची तक्रार त्यांनी महापालिका व पोलीस प्रशासनाकडे आपले सरकार या ऑनलाईन ॲपद्वारे नोंदवली आहे.
एमआयडीसी नवनागपूर परिसरामध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीची कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना, संस्थेचे रजिस्ट्रेशन नसताना बोगस पावती बुक छापून नागरिक, उद्योजक व व्यापाऱ्यांकडून वर्गणीच्या नावावर आर्थिक लूट सुरू करण्यात आली आहे. जयंती उत्सव समाज मंदिरात साजरा न करता कोणतीही परवानगी न घेता रस्त्यावर अतिक्रमण करून जयंती साजरी केली जात आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पध्दतीने मांडव टाकण्यात आले असल्याचा आरोप लोकशाहीर आण्णाभाऊ साठे युवा मंचच्या वतीने करण्यात आला आहे. तर संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे.