• Wed. Oct 15th, 2025

अंगणवाडी ताईंना निरोप देताना सर्वांनाच अश्रू अनावर

ByMirror

Jul 5, 2023

सुशीला ताई गायकवाड यांचा सेवापूर्ती कार्यक्रमात सलाबतपूर ग्रामस्थ झाले भाऊक

अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांबरोबरच सहकार्‍यांनाही लळा लावणार्‍या अंगणवाडी ताई सुशीला गायकवाड यांना त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त निरोप देताना सर्वच उपस्थितांना अश्रू अनावर झाल्याचे अनोखे चित्र नुकतेच सलाबतपूर (ता.नेवासा) येथे पहावयास मिळाले.
मुकिंदपूर येथील अंगणवाडी सेविका सुशिलाताई मोगल गायकवाड यांच्या सेवापूर्ती निमित्त त्यांचा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या नेवासा गटाच्या वतीने सलाबतपूर येथे त्यांचे पती मोगल गायकवाड यांच्यासह सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र बावके होते.


यावेळी बोलताना अंगणवाडी सेविकांनी गायकवाड यांचे सर्व अंगणवाडी सेविकांना नेहमी सहकार्य राहिले, शासकीय कामकाजामध्ये नेहमी त्यांनी सर्वांना मदत केल्याची भावना व्यक्त केली. उपस्थित अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना यावेळी अश्रू अनावर झाले. आपल्या लाडक्या अंगणवाडी ताईंना निरोप देताना सर्वांचे अश्रूंनी डबडबलेले डोळे गायकवाड या फक्त अंगणवाडी पुरत्याच मर्यादित नसून त्या सामाजिक कार्यामध्येही अग्रेसर असल्याची जणू साक्ष देत होते.

या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या अहमदनगर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या अध्यक्षा मदिना शेख, शरद संसारे, जीवन सुरडे, प्रकल्प सुपरवायझर भावना पवार, नेवासा तालुका अध्यक्ष मन्नाबी शेख यांनी आपल्या भावना व्यक्त करुन अंगणवाडी सेविकांचे महत्त्वपूर्ण कामाचे कौतुक केले. याप्रसंगी स्वाती हिवाळे, छाया मते, निर्मला वांडेकर, पेरे ताई आदींसह सलाबतपूर गटातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विमल वांडेकर यांनी केले. आभार मायाताई जाजू यांनी मानले.

संघटना हेच माहेर -गायकवाड

अंगणवाडी सेविका म्हणून काम करताना अंगणवाडी कर्मचारी संघटनेने वेळोवेळी मोठा आधार दिला. संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी मुलीसारखा जीव लावला. त्यामुळे मी संघटनेला आपले माहेर मानते, अशी कृतज्ञ भावना सुशीलाताई गायकवाड यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *